नितीन गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली बोरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा…

670

नागेश इटेकर (प्रतिनिधी)

गडचिरोली जिल्ह्यातील 350 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने बाजी मारली तर त्यापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघटनेने ही आपापला गट शाबूत ठेवला आहे.

अहेरी तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली .एकूण सात सदस्य असलेली बोरी ग्रामपंचायत निवडणूक नितीन गुंडावार यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली, आणि सात पैकी चार उमेदवार विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघटना विरुद्ध भाजपा अशी काट्याची टक्कर असताना नितीन गुंडावार यांनी राजकीय पद प्रतिष्ठा पणाला लावून चार उमेदवारांसह विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवला.

राष्ट्रवादीचे महेश बाकीवार या युवा नेत्याच्या नेतृत्वात सात उमेदवार रिंगणात उभे करण्यात आले होते. राजकारणाचा तेवढा अनुभव नसताना सुद्धा सात पैकी दोन उमेदवार बहुमताने निवडून आणून राजकारणाच्या गणितात ते पास झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात आणि त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

नितीन गुंडावार हे राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांचा नितीन गुंडावर यांच्यावर भरीव विश्वास असल्याचे बोलले जाते, त्या विश्वासाचे फलित बोरी ग्रामपंचायतीवर एक हाती मिळविलेला विजय आहे असे नितीन गुंडावार यांनी इंडिया दस्तक टीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले.