Homeचंद्रपूर"छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक धोरण..."लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरज दहागावकर यांचा...

“छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक धोरण…”लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरज दहागावकर यांचा विशेष लेख…

छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक धोरण…”
-सुरज पि. दहागावकर

आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. १९७१ मध्ये सेंट्रल स्टँटिस्टिकल अर्गनायजेशन च्या आकडेवारीनुसार देशातील ७०% जनता हि शेती व त्या आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच राष्ट्रीय उत्पादनातील ४०% वाटा हा देशातील कृषी चा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून शेती कडे बघितल्या जाते. आजही देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. शेतीमुळे प्रत्येकाला खायला मिळते, यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला “बळीराजा” असे संबोधले जाते. पण सध्या बळी हा शेतकऱ्याचा जातो आहे. अन् राजा कुणीतरी दुसराच होतो आहे..

शेती आणि शेतकऱ्यांविषयी आज विदारक आणि घातक असे चित्र डोळ्यासमोर उभे आहे. कारण ज्या वेळी आपण मराठवाडा, विदर्भाचा विचार करतो तेव्हा शेतकरी आत्महत्या ह्या मोठ्या प्रमाणात होत असताना दिसतात. दररोज सकाळी वर्तमानपत्रात हातात घेतले तर एक बातमी निश्चित असते की, अमुक अमुक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे केली आत्महत्या.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तोपर्यत थांबणार नाही जो पर्यत सत्तेवर आलेले सरकार शेतीच्या विकासासाठी चांगले धोरणे राबवून कृषी व्यवसायाला चालना देणार नाही. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे तीच परिस्थिती त्या काळातही भेडसावत होती. पण अश्याही भयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी एक जनतेचा राजा त्यावेळी कोल्हापूर संस्थानात राज्यकारभार करीत होता. त्याचेच नाव म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज होय…

शाहू महाराजांनी दुष्काळाच्या वेळी शेतीसाठी कर्ज देण्याकडे विशेष लक्ष दिले होते. १८९७-९८ च्या अहवालानुसार ३२,२०१/- रुपये तर १९०६-०७ च्या अहवालानुसार १२,५००/- रुपये तगाई म्हणून दिले. तसेच कोल्हापूर संस्थांनाच्या ट्रेझरीमधून २६७६८ कर्जाऊ म्हणून दिले. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण असायच्या. या जमिनी शेतकरी वर्गाला परत मिळाव्यात या हेतूने १८९५ पासून कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसाठी थोड्या अटीवर कर्ज देण्यास सुरुवात शाहू महाराजांनी केली. तसेच राणी व्हीक्टोरिया हिच्या निधनानंतर कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मदत मिळावी म्हणून सम्राज्ञी नावाने एक फंड सुरु केला.

१९१४ मध्ये भरलेल्या पहिल्या शेतीविषयक प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी बोलतांना शाहू महाराज म्हणतात की, “माझ्या संस्थानात अश्या प्रकारचे शेतीचे प्रदर्शन पहिल्यांदाच भरविले आहे. त्यामुळे शेतीकरीवर्गावर त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसून येतील. प्रदर्शनाचे तीन भाग करण्यात आले होते. पहिला विभाग जनावरांचा होता, यामध्ये एकूण ६७४ जनावरे प्रदर्शनासाठी आले होते. पहिल्या विभागासाठी महाराजांनी १०६४ रुपयांचे बक्षीस दिले होते. दुसरा विभाग हा शेतीसाठी होता. या विभागात एकूण शेतीच्या १९९६ वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या विभागाला महाराजांनी १७० रुपयांचे बक्षीस दिले आणि तिसरा विभाग हा कला आणि औद्योगिक साठी होता. या विभागात एकूण १६९० वस्तू ठेवल्या होत्या. या विभागासाठी महाराजांनी १८० रुपयांचे बक्षिस दिले. याशिवाय ३० ब्राँझ आणि ३० चांदीचे पदकेही दिली.

या प्रदर्शनात सुधारित पद्धतीने शेती कशी करावी तसेच शेतीचे नवनवे प्रयोग असे केल्या जातील ह्या विषयावर मार्गदर्शन आणि सखोल असे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुण्याचे शेतकी कॉलेज चे त्यावेळीचे प्राचार्य डॉ.हेराल्ड मॅन यांनी सदिच्छा भेट दिली.

शाहू महाराजांच्या काळात ८०% जनता हि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व्यवसायावर अवलंबून होती. आपल्या संस्थानातील शेतीमध्ये शाहू महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन लागवडी करवून घेतल्या. शाहू महाराजांना दक्षिण भारतात कॉफी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते असे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी कॉफी चे उत्पादन आपल्या संस्थानात घेण्याचा विचार केला. तेव्हा त्यांनी दक्षिण भारतातील भौगोलिक परिस्थिती, हवामानाची पाहणी करून तज्ज्ञाकडून सल्ला घेतला. तसेच वर्षभर कोल्हापूर संस्थानात पाऊस पडत नव्हता तरीही डोंगराळ भागाची जमीन पडीक राहू नये म्हणून पहिल्याच वर्षी कॉफीची लागवड केली. मृग नक्षत्रात सुरुवातीलाच २००० रोपटे आणून म्हैसुरी पद्धतीने लागवड केली. यानंतर दोन वर्षांनी भुदरगड पेट्यातही काफीच्या लागवडीचे प्रयोग केले.

कॉफीप्रमाणे चहा लागवडीकडेही महाराजांनी लक्ष देऊन चहा ची लागवड सर्वप्रथम पन्हाळ्याला केली, तसेच बुंदाच्या झाडाची लागवड सुद्धा केली, याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा होता. १९११ मध्ये सातवा एडवर्ड बादशहाच्या मृत्यूनंतर एक शोकसभा बोलाविण्यात आली होती. या शोकसभेत एक फंड गोळा करून त्यांची एक संस्था काढावी असे निर्णय घेण्यात आला. त्यावेळी एकूण फंड ३४२४१/- रुपये जमा झाले आणि हि रक्कम संस्थानाच्या तिजोरीत ६% व्याजाने ठेवण्यात आली. मिळालेल्या व्याजातून किंग एडवर्ड अग्रीकल्चरल इन्स्टिस्ट्यूट स्थापन करण्यात आली. या इन्स्टिस्ट्यूट महाराजांनी ५०००/- मदत म्हणून दिले तसेच १०००/- वार्षिक ग्रँट सुद्धा सुरु केली. या संस्थेचा सुधारीत शेतीपद्धती निर्माण करून ती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्हावी हा उद्देश होता. त्यासाठी शेती अवजारांचे एक म्युजियम सुरु करण्यात आले. “शेतकी आणि शेतकरी” या पुस्तकाच्या पन्नास प्रती विकत घेऊन त्या शेतकऱ्यांना मोफत वाटल्या. शेती संशोधनाला व लागवडीला जोड म्हणून आदर्श शेती चे शाहू महाराजांनी प्रयोग केले.

आदर्श शेतीवर दरवर्षी रुपये १,०००/- च्या वर रक्कम खर्च होत होते. आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी भात, गहू, ऊस, कडधान्य, डाळी, कोबी, बटाटे, मिरच्या, ज्वारी, भुईमुग इत्यादीच्या लागवडीचे प्रयोग केले. तसेच अमेरिकेहून भुईमुग आणून लागवड केली. शेती हा हंगामी असा व्यवसाय होता. हंगाम संपला की शेतकऱ्याकडे काम नसायचे, रोजगार नसायचा त्यामुळे शेतीच्या विकासासोबत शेतीच्या पूरक धंद्याकडेही शाहू महाराजांनी विशेष लक्ष दिले होते. शेती मधून निघणाऱ्या शेतीमालासाठी विक्री संघटना नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी सहकारी पतपेढ्या काढण्यासाठी लोकांना सांगून ते प्रत्यक्षात स्थापन सुद्धा केल्या.

एका भाषणात शाहू महाराज म्हणतात की, शेतीकाम हे इतके पवित्र्य आहे की, वैदिक काळात इथला चक्रवर्ती सम्राट आणि त्यांचे मंत्री सुद्धा नांगर चालवीत असत. त्यामुळे ज्याने टाकलेल्या एका दाण्यातून हजारो दाणे तयार होऊन अनेक लोक आपला उदरनिर्वाह करतात अश्या कृषिकामाला मी वाईट किंवा हलकं असे मानत नाही. अश्या या दूरदृष्टीच्या शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील शेतीचा आणि शेतकऱ्यांचा कायापालट करून टाकला…

(संदर्भ:-राजश्री शाहू गौरव ग्रंथ)

सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर.
मो.न. 8698615848

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!