प्रतिनिधी रविंद्र सदमवार! इंडिया दस्तक न्यूज टीव्ही
भामरागड : सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन (SSWF) यांच्या वतीने भामरागड तालुक्याचा भव्य ओपनिंग कार्यक्रम ताडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष श्री. मनोजकुमार डांगे साहेब, महाराष्ट्र सचिव श्री. संजयजी सतई, श्री. रमेश उप्पलवार, ताडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक लालसू आत्राम तसेच रवींद्र सादमवार (अध्यक्ष, SSWF, तालुका – भामरागड) यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय तालुक्यातील ४ विभाग प्रमुख, ३५ केंद्रप्रमुख तसेच मोठ्या संख्येने गावकरी वृंद उपस्थित होते.
या वेळी अध्यक्षांनी SSWF सभासदांना मिळणाऱ्या विविध लाभांची सविस्तर माहिती दिली. फक्त २५० रुपये वार्षिक सभासद शुल्क भरून सदस्यत्व घेतल्यास मुलगी जन्माला आल्यावर आर्थिक मदत, नैसर्गिक व अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य, तसेच आरोग्य सुविधांमध्ये सवलत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. SSWF अंतर्गत नियुक्त दवाखाने, रुग्णालये, रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, MRI तसेच औषध खरेदीवर १ ते २० टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे.
यासोबतच शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट दीदी योजना, सैनिक-शेतकरी TS अॅग्रो मॉडेल, महिला व पुरुष बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी, मोफत प्रशिक्षण व लायसन्स, विमा सुविधा तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची माहिती देण्यात आली. प्रत्येक विभागात ड्रोन पायलट व को-पायलट दीदी यांना रोजगाराच्या संधी व मासिक मानधन मिळणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे व थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी SSWF कडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमामुळे भामरागड तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट व युवकांमध्ये मोठे नवचैतन्य निर्माण झाले आहे.








