कसनसूर येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न…

169

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार कसनसूर :टीडीसी केंद्र तसेच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कसंसूर येथे आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सईनुजी गोटा यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
टीडीसी अंतर्गत येणाऱ्या कसंसूर परिसरातील शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन धान खरेदी तात्काळ सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना आता आपले धान विक्रीसाठी दूर जावे लागणार नसून, योग्य दरात व वेळेत खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभापती लालसुजी नरोटे, सुधाकर गोटा, सुनील मडावी, चित्तरंजन दास, नरेश गावडे, बारसू उसेंडी, टीडीसीचे कर्मचारी, गावचे पाटील भूमिया तसेच कसंसूर केंद्रातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे संचालक म्हणून बहुमताने निवडून आलेल्या सईनुजी गोटा यांचा सभापती लालसुजी नरोटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास निक्की पुगाठी, सुमित गोटा यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कसंसूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.