इंडिया दस्तक न्यूज टीव्ही वृत्त
अहेरी : रेपणपल्ली पोलीस स्टेशनच्या पथकाने 12 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या नाकाबंदी दरम्यान दुचाकी वाहनाची तपासणी केली असता, वाहनावरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने दोन्ही पायांमध्ये पिशवी लपवून ठेवली असल्याचा पोलिसांना संशय आला. त्याची तपासणी केल्यावर पिशवीत गांजा आढळून आला.
सदर इसम हे तेलंगणा राज्यातील असल्याचे समोर आले असून, त्यांच्या ताब्यातून एकूण 1 किलो 108 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी अधिकारी, उपपोलीस स्टेशन रेपणपल्ली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे यांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा तसेच स्थलिक गुन्हे शाखा गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करीत आहेत.