ग्रामपंचायत ऊर्जानगरच्या दुर्लक्षामुळे वार्डात कचऱ्याचे साम्राज्य
सफाई गाड्या वापराऐवजी पाण्याच्या टाकीत लपवून ठेवल्याचा आरोप
संपादक प्रशांत बिट्टूरवार! इंडिया दस्तक न्यूज पोर्टल
ऊर्जानगर (चंद्रपूर) :
ग्रामपंचायत ऊर्जानगरच्या गंभीर लापरवाहीमुळे समता नगर वार्ड क्र. १ व साईनाथ सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात समता नगर येथील रहिवासी गौरव अजय मोहबे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायत मार्फत दर एक ते दोन दिवसांनी सफाई गाडी येत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात कचरा उचलला जात नसून तो तसाच पडून राहत आहे. परिणामी दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतकडे पुरेसे मनुष्यबळ व सफाईसाठी ई-वाहने (महागड्या सफाई गाड्या) उपलब्ध असतानाही त्या वापरात आणल्या जात नाहीत. या सफाई गाड्यांच्या नंबर प्लेट काढून त्या पाण्याच्या टाकी परिसरात लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.

नागरिकांच्या कराच्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या महागड्या वाहनांचा वापर न करणे म्हणजे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी हा मुद्दा उपस्थित केला असता सरपंच, सचिव व संबंधित सदस्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या निवेदनाद्वारे पडून असलेल्या सफाई गाड्या तातडीने ग्रामपंचायतमध्ये आणून वापरात घ्याव्यात व वार्डातील कचऱ्याची समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तातडीने उपाययोजना न झाल्यास उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या तक्रारीच्या प्रती गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर व तहसीलदार, चंद्रपूर यांना पाठवण्यात आल्या असून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








