Homeगडचिरोलीनव्याने पुनर्बांधणी करुन शेतकरी कामगार पक्षात तरुणांना संधी देणार : भाई जयंत...

नव्याने पुनर्बांधणी करुन शेतकरी कामगार पक्षात तरुणांना संधी देणार : भाई जयंत पाटील राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या बरखास्त

गडचिरोली / चक्रधर मेश्राम सहसंपादक

शेतकरी कामगार पक्ष हा देशातील जूना ब्राह्मणेतर राजकीय पक्ष असून शाहू फुले आंबेडकरांचा कृतिशील वैचारिक वारसा जपणारा आणि मार्क्स,लेनीन,माओच्या क्रांतिच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. भांडवली व जातीयवादी पक्षांना शह देण्यासाठी जनतेला शेकाप सारख्या पक्षाचीच गरज असल्याने पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या बरखास्त करण्यात येत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी जाहीर केले.
सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीची दोनदिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाई गणपतराव देशमुख यांच्या पत्नी आणि जेष्ठ कार्यकर्त्या रतनआक्का देशमुख, चिटणीस मंडळ सदस्य माजी आमदार भाई संपतरावबापू पवार पाटील, प्रा.एस.व्ही.जाधव, आमदार भाई बाळाराम पाटील, माजी आमदार भाई धैर्यशील पाटील, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे, खजिनदार भाई राहुल पोकळे,भाई जे.एम.म्हात्रे, भाई बाबासाहेब कारंडे,भाई उमाकांत राठोड,भाई रामदास जराते, भाई विकासकाका शिंदे,भाई चंद्रकांत देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांचे पक्षसंगठनाबाबत काल मते जाणून घेतल्यानंतर मध्यवर्ती समिती आणि चिटणीस मंडळाच्या वतीने सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी पक्षसंगठनाबाबत सदरचे ऐतिहासिक भूमिका जाहीर करताना म्हटले की, पुरोगामी म्हणवणारे तथाकथित पक्ष हे जातियवादी पक्षांशी मिळून असल्याने शेकाप सारख्या खऱ्या पुरोगामी पक्षांशी दगाबाजी करतात. त्यामुळे प्रागतिक विचारांच्या पक्ष आणि संघटनांना एकत्र करून राज्यात नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. हे करीत असताना शेतकरी कामगार पक्षाकडून राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठीच वैचारिकदृष्ट्या परिपक्व तरुणांना राज्य चिटणीस मंडळ आणि मध्यवर्ती समिती कडून पक्ष संघटनेत संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत शेतकरी कामगार पक्ष नव्या ताकदीसह जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरचा आक्रमक पवित्रा घेऊन काम करेल, असेही भाई जयंत पाटील म्हणाले.
भाई गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने सांगोला तालुक्यातील विरोधक संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र पक्ष कार्यकर्ते एकत्र आणि विचारांचे असून पाठीत खंजीर खुपसऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सक्षम आहेत. आमच्या पक्ष पारिवारिक बाबींमध्ये इतरांनी दखलबाजी करु नये असा टोलाही भाई जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला.
शेतकरी कामगार पक्षाची पुनर्बांधणी करतांना जुन्या निष्ठावंतांना चिटणीस मंडळ आणि मध्यवर्ती समिती कडून डावलण्यात येणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे,असा विश्वासही सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!