जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या आदिवासी बहुल तालुक्याचा आढावा
बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिवती, राजुरा आणि कोरपणा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. उपरवाही येथील अंबुजा फाउंडेशन कार्यालयात बुधवारी झालेल्या तालुकास्तरीय बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे अध्यक्षस्थानी होते.
बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मूलन, माता-बाल संगोपन, लसीकरण, गरोदर माता नोंदणी, अतिजोखमीच्या मातांची तपासणी तसेच सिकल सेल आजार यासंदर्भातील कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. विविध आरोग्य निर्देशांकांत सुधारणा करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा डॉ. माधुरी टोंगे यांनी घेतला. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी हिवताप व हत्तीरोग नियंत्रणाबाबत माहिती दिली. डॉ. कांचन टेंभुर्णे यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा सादर केला. माता-बाल संगोपन व सिकल सेल विषयक माहिती डॉ. मनोज गिरी यांनी मांडली, तर साथरोग नियंत्रणाबाबत डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर, टेली कन्सल्टेशन समन्वयक दीपक तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विभागीय समन्वयक डॉ. रुपेश कुमारवार उपस्थित होते. बैठकीचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे तथा डॉ. प्रकाश नगराळे यांनी केले. बैठकीस तीनही तालुक्यांतील वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व विविध विभागांचे समन्वयक उपस्थित होते.







