इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा संताप
पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध; गॅस दर कमी करण्याची मागणी.
प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील एचपी पेट्रोल पंपासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार तसेच माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे गृहिणी, शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरकारने “अच्छे दिन”चे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केली असून महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी करावेत, इंधन दरवाढ नियंत्रणात आणावी, गॅसवरील अनुदान वाढवावे तसेच कृत्रिम तुटवडा दूर करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर, शहर काँग्रेस अध्यक्ष राजू झाडे, शंभू येलेकर, तुकेश वानोडे, तुकाराम झाडे, अजय माडुरवार, देवेंद्र बटॆ, देविदास सातपुते, महेंद्र कुणघाटकर, आशिष निमगडे, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, माधव लडके, सुरेश श्रीवासकर, नामदेव सांगळे, जितेंद्र गोहणे, दिलीप पुलगमकर, प्रकाश हिवरकर, महेश सोनाकुलवार, अमित फरकडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







