एटापल्ली तालुक्यात खळबळ; देवदा येथे तरुणाचा रहस्यमय मृत्यू
प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली : तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील हालेवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार अपघात आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH 34 BF 2560 क्रमांकाची ब्रेझा (Brezza) कार घेऊन आलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख सतीश निसाद अशी असल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून नेमके काय घडले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. घटनेची माहिती मिळताच हालेवरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.
याबाबत हालेवरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाबेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “घटनेचा सखोल तपास सुरू असून सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती देता येईल,” असे सांगितले.
पोलीस घटनास्थळावरील पुरावे गोळा करत असून मृत्यूमागील कारणांचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
देवदा येथील या रहस्यमय मृत्यू प्रकरणामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.







