माझे कुटुंब माझी जबाबदारी
66 हजार कुटुंबातील 2 लाख 37 हजार जणांची तपासणी पुर्ण
या मोहिमेतून कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबवता येतील
गडचिरोली : कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी तसेच स्वत:हून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे. तसेच कोरोना बाबत शासनाकडून सुरू करण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. या मोहिमेचा उद्देश कोरोना बाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामूळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या माहिमेचा पहिला टप्पा 21 सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 11 लक्ष नागरिकांची तपासणी होणार आहे. आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या 2,37,989 जणांच्या तपासणीनंतर 406 जण सारी व आयएलआयचे व्यक्ती मिळाले. तसेच ऑक्सीजन पातळी आवश्यक 95 पेक्षा जास्त नसलेले 911 जण मिळाले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून 506 जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे. संदर्भित केलेल्या 506 व्यक्तींपैकी कालपर्यंत कोविड तपासणी केलेल्या 18 जणांपैकी 3 जण कोरोना बाधित आढळले. उर्वरीत जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे येत्या कालावधीत होणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले कित्येक नागरिकांना स्वत:ला असलेल्या जुन्या आजारांबद्दल माहिती नसते. अशा वेळी कोरोना संसर्ग धोकादायक ठरू शकतो. कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. या संसर्गावर जरी औषध नसले तरी वेळेत दवाखान्यात दाखल करून संसर्गाची वाढ रोखण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीची औषधे, तसेच असल्यास इतर आजारांवरील उपचार तातडीने देता येतो. आणि त्या ठिकाणी ऑक्सीजन व्यवस्था असते त्याचाही वापर आवश्यकतेनुसार करण्यात येतो. जिल्हयात आत्तापर्यंत 1800 हून अधिक जणांनी यशस्वरीत्या कोरोनावर मात केली आहे. आता जिल्हयात कोरोना लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला जरी इतर आजार असले आणि वेळेत उपचार केले तर कोरोनावर मात करणे शक्य असते. आत्तापर्यंत बहूतेक जण उशिरा दवाखान्यात दाखल झाल्यानेच मृत्यू झाल्याच्या नोंदी जास्त वाढतात असे सर्वदूर आहे. वेळेत उपचार सेवा देण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम महत्वाची आहे.
या मोहिमेंतर्गत तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या घरांची व कुटुंबातील सदस्यांची माहिती – अहेरी – 2545 (10466), आरमोरी – 6129 (22340), भामरागड -2239 (7789), चामोर्शी – 11592 (35644), धानोरा – 9191 (34191), एटापल्ली – 907 (3723), गडचिरोली – 6573 (19296), कोरची- 4579 (17157), कुरखेडा -8802 (29169), मुलचेरा – 3676 (11850), सिरोंचा – 3426 (10320) व वडसा – 6527 (36044).
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त 5 मिनीटात तपासणी पुर्ण होते. यासाठी नागरिकांनी आलेल्या कोरोनादूतांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवयक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.