गोंडपिपरीत ‘लेडी सिंघम’ची धडक कारवाई; पुरुष अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त; महिला अधिकाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक, पुरुष अधिकाऱ्यांच्या ‘शांतते’वर संशय
प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी :
तालुक्यातील महसूल विभागातील महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीतील तफावत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे महिला अधिकारी आक्रमक आणि प्रामाणिकपणे अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसत असताना, दुसरीकडे काही पुरुष अधिकारी मात्र शांत भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
दि. १९ रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चेक पारगाव परिसरात गस्तीवर असताना आर.आय. कांबळे यांच्या पथकाला अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन थांबवण्याऐवजी सुसाट वेगाने पळ काढला. पकड टाळण्यासाठी चालकाने चालत्या ट्रॅक्टरमधील रेती रस्त्यावर टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, कांबळे यांनी धाडस दाखवत आपल्या सहकाऱ्यांसह (संदीप बोधनवार आणि गौरव मेश्राम) ट्रॅक्टरचा पाठलाग केला. काही अंतरावर थरारक पाठलागानंतर MH-34-AP-0949 क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडण्यात आला. संबंधित वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे महिला अधिकाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, तालुक्यात सातत्याने होणाऱ्या अशा कारवायांमध्ये महिला अधिकारीच पुढे का दिसतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्क्रियता किंवा शांतता ही केवळ योगायोग आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी यामागे अवैध धंदेवाल्यांशी असलेल्या संभाव्य ‘मिलीभगती’चाही संशय व्यक्त केला आहे.
महिला अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रशासनाचा दरारा वाढत असताना, पुरुष अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
“जेव्हा महिला अधिकारी जीवावर उदार होऊन माफियांचा पाठलाग करतात, तेव्हा पुरुष अधिकारी बघ्याची भूमिका घेतात, हे दुर्दैवी आहे.”
— तन्मई गायकवाड, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस







