गडचिरोली
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता आता प्रशासनाकडून कोरोना बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची संमती व निर्णय संबंधित रुग्णाचा असेल असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. ज्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत अशा रुग्णांना हा पर्याय निवडता येणार आहे. याची अट तो शहरी भागात राहणार असावा तसेच त्याचाकडे घरी स्वतंत्र राहण्याची तसेच शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. सद्या ग्रामिण भागातील रुग्णांना या पर्यायाचा लाभ घेता येणार नाही.
लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गृहविलगीकरणाची सोय त्याच्या स्व:इच्छेने देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडील रुग्णांची क्षमता सद्या एक हजारापर्यंत आहे. तसेच आता सक्रिय रुग्ण 537 आहेत तरीही काही रुग्णांची घरी राहण्याची ईच्छा असल्यास त्यांना अटी व शर्तीनुसार मुभा दिली जाणार आहे. एखादया रुग्णाला घरी राहण्यास परवानगी दिल्यानंतर सोबत एक माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध सूचना, घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित रुग्णाकडे ऑक्सीमीटर, थर्मोमीटर असल्यास त्याच्या नोंदी दैनंदिन स्वरुपात त्या पुस्तिकेत नोंदवायच्या आहेत. जर ऑक्सीमीटर नसेल तर आरोग्य विभाग काही अग्रीम रक्कम भरुन ऑक्सीमीटरही पुरवठा करणार आहे. प्रत्येक गृह विलगीकरणातील रुग्णाने दररोज त्या पुस्तिकेत दोन वेळा प्राणवायुची (SPo2), नाडीचे ठोके, तापमान याबाबत नोंदी लिहायच्या आहेत. जर काही लक्षणे आढळून आली तर त्या पुस्तकात नमूद संपर्क क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावयाची आहे. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा, आरोग्य सेवक यांची नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.