जिल्हयातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक येणार

629

 

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

नागपूर विभागातील पुरपरिस्थितीमुळे झालेल्या विविध प्रकारच्या नुकसान पाहणीकरीता केंद्रीय पथक गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयात दिनांक 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान येत आहे. या पथकामध्ये केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव, संचालक यांचा समावेश आहे.

गडचिरोली, आरमोरी तसेच वडसा तालुक्यातील गावांना भेटी देवून शेतीविषयक, घरांचे तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानाबाबत ते प्रत्यक्ष गावात जावून आढावा घेणार आहेत. सद्या कोरोनास्थिती व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावस्तरावर नागरिकांनी गर्दी न करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. केंद्रीय पथक काही गावांमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पूरबाधितांच्या शेतात, घरात जावून संवाद साधतील. त्यामूळे ज्या गावात पथक भेट देईल त्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. गावस्तरावर फक्त महत्वाच्या व्यक्ती यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी पथक दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष उपस्थित रहाणे गरजेचे आहे.

केंद्रीय पथकाकडून चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा या जिल्हयांची पाहणी होणार आहे. यामध्ये दोन पथक असून एक पथक गडचिरोली, चंद्रपूरची पाहणी करणार आहे. तर दुसरे पथक नागपूर, भंडार व गोंदिया जिल्हयाची पाहणी करणार आहे.