दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा भीषण अपघात; २ ठार एक गंभीर

536

गडचिरोली :- गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर चालक गंभीर जखमी झाला.
मुकरू गोमसकार (५५ रा.मुरखळा) असे मृत पादचाऱ्याचे नाव असून एकाची ओळख पटलेली नाही.सूरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायतजवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.