Home गडचिरोली ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

1617

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने तब्बल ७ ते १० ट्रक जाळल्याच्या घटना आज २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली सुभाष जयदार (४२ रा.कांचनपूर ता.मुलचेरा) हे आलापल्लीकडून कांचनपूर आपल्या गावाकडे आपल्या पतीसोबत दुचाकीने जात होत्या. शांतिग्रामजवळ दामपूर फाट्यावर ट्रक आणि दुचाकीत आपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी या राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेले तब्बल ७ ते १० ट्रक जाळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव घटनास्थळी आपल्या चमुसह दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमनचे वाहन सुद्धा पाठविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती नसली तरी अहेरीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दक्षिण गडचिरोली भागात आलापल्ली ते आष्टी दरम्यान असलेल्या ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गाची मागील काही दिवसांपासून अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने सुरजागड येथून लोह दगड घेऊन जाणारे जड वाहन नेहमीच खड्ड्यात फसत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या अनेक बसेस मुलचेरा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. सध्या या रस्त्यावर वाहनधारकांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्त्यावरील खड्डे, प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या त्वरित सोडविण्यासाठी आलापल्ली आणि नागेपल्ली येथील व्यापारी संघटनेने १२ ते १४ सप्टेंबरपर्यंत बेमुदत मार्केट बंद ठेवले होते हे विशेष. मागील काही दिवसांपूर्वी आलापल्ली येथील मुख्य चौकात सुरजागड लोहखणीतील ट्रकने बसला धडक दिली होती. सुदैवाने प्रवाशांना काही झाले नसले तरी एसटी महामंडळचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

सुरजागड येथील डोंगरावरुन त्रिवेणी अर्थमूव्हर्स आणि लॉयड मेटल्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. या खनिजाची वाहतूक टिप्पर आणि ट्रकद्वारे होत असून, दररोज चारशे ते पाचशे ट्रक रस्त्यावरुन धावत असल्याने आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-एटापल्ली हे दोन प्रमुख रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. परंतु प्रशासनाने लोकभावना लक्षात न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Don`t copy text!