Homeगडचिरोलीजहाल नक्षली जोडप्याची शरणागती, गडचिरोली पोलिसांचे यश

जहाल नक्षली जोडप्याची शरणागती, गडचिरोली पोलिसांचे यश

गडचिरोली : २० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी जोडप्याने पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे शरणागती पत्करली. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी बुधवारी (ता१६) पत्रकार परिषदेत दिली. शरण आलेल्या नक्षलवाद्यांची नावे दीपक उर्फ मुन्शी रामसु ईष्टाम (वय ३४, रा. गडेरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) व शामबत्ती नेवरू आलाम (वय २५, रा. हिदवाडा, जि. नारायणपूर, छत्तीसगड) अशी आहे.

दीपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटून क्र.२१ मध्ये कार्यरत होते. दीपक ईष्टाम हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटुन सदस्य म्हणून कार्यरत होती. दीपकवर खूनाचे ३, चकमकीचे ८, जाळपोळ २ असे गुन्हे दाखल असून, दीपकची पत्नी शामबत्ती हिच्यावर चकमकीचे २ असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने दीपकवर १६ लाखांचे, तर शामबत्तीवर ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर २ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाल्याचे पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले. या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडली.

आतापर्यंत ६४९ नक्षली शरण

वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा ,शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, तसेच हिंसाचाराला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आतापर्यंत एकूण ६४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले असून २०१९ ते २०२२ या तीन वर्षांच्या काळात आतापर्यंत एकूण ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ५ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३४ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

”विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. त्यामुळे त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा व सन्मानाचे जीवन जगावे. पोलिस दल त्यांना सर्वतोपरी मदत करेल.”

– अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!