गडचिरोली:( चक्रधर मेश्राम )
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका अंतर्गत असलेल्या प्राथमिक रुग्णालयात एका 28 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची घटना काल रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली.
सदर घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालय धानोरा येथून जाणून घेतली असता मृतक महिला ही कतकल या गावची असून ती गरोदरपणात उपचारा करिता मंगळवारी रुग्णालयात दाखल झाली होती.
परंतु तीन दिवसापर्यंत योग्य तो उपचार न झाल्यामुळे, गरोदर महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यामुळे या वेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले हात वर करून गडचिरोली महिला रुग्णालयात मृतक महिलेला स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला. मृतक महिलेला 108 ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नसून तिला ऑक्सीजन सोय नसलेल्या आणि सोबतिला डॉक्टर उपलब्ध न करता,केवळ रुग्णवाहिकेच्या चालकाच्या भरोशावर तिला गडचिरोली महिला रुग्णालयात पाठवण्याचा पराक्रम धानोरा च्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केला.
परंतु दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू, महिला रुग्णालयात गडचिरोलीला पोहचण्या अगोदर रस्त्यातच झालेला होता,आणि त्या परिस्थितीतच तिला गडचिरोली महिला रुग्णालयात पोचविण्यात आले होते. सदर घटनेची माहिती महाराष्ट्र माझा न्यूज च्या प्रतिनिधीला कळताच, ताबडतोब महिला रुग्णालयात जाऊन मृतक महिलेचा मृत्यू झाल्याची सविस्तर माहिती घेण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गरोदर मातांना शासनाकडून विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असताना सुद्धा, डॉक्टरांच्या अभावी आणि केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गरोदर मातेचा आज दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची विदारक परिस्थिती आज पाहायला मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यात, स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही आरोग्य सुविधेच्या अभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्यामुळे,आता आरोग्य विभागाच्या कार्य प्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर महिलेला मृत अवस्थेत गडचिरोली महिला रुग्णालयात आणल्यामुळे , महिला रुग्णालय मार्फत पोलिस ठाण्यात सूचना देण्यात आली असून,मृतक महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी आणि शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.
सदर चा निष्काळजीपणा करणाऱ्या धानोरा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांची कठोर चौकशी करून मुद्दाम पणे दुर्लक्ष करणाऱ्या करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतक महिलेच्या नातेवाईकांनी केलेली आहे.