प्रतिनिधी/ गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली. यानंतर जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन कोणतीही पूर्वतयारी न करता जनावरांचा लिलाव करण्यात आला व जनावरे कसायांच्या तावडीत देण्यात आली. या प्रकाराचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत असून याला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर ने गडचिरोली न.प.च्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर नगर परिषदेने ३५ जनावरांना पकडून लांजेडा येथिल कोंडवड्यात टाकले होते. यानंतर १२ ऑगस्ट रोजी या जनावरांचा लिलाव करण्यात आला. परंतु ही जनावरे कसायांना विकण्यात आल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
जनावरे कोणत्या दिवशी कोंडवाड्यात टाकण्यात आली, जनावरांचा लिलाव किती दिवसांनी करण्यात आला, लिलाव करण्या आधी दवंडी, नोटीस किंवा कोणाला माहिती देण्यात आली का, जनावरांची आरोग्य तपासणी करण्यात आली का, लिलावात शेतकरी किंवा पशुपालकांनी सहभाग घेतला काय, लिलावात सहभागी व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जनावरांना टेम्पो मध्ये भरून का नेले, जनावरांना वाहून नेण्याची परवानगी कोणी दिली याची तपासणी केली का असे प्रश्न आता पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर या संस्थेने उपस्थित केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण? – दोषींवर कारवाई करण्याची पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर ची मागणी
RELATED ARTICLES