धानोरा–सिरोंचा भागात डेंगू-मलेरियाचा प्रादुर्भाव; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी दिल्या तात्काळ सूचना…

115

प्रतिनिधी सतीश कुसराम

गडचिरोली :दि.०४ सप्टेंबर २०२५
तालुका सिरोंचा व धानोरा परिसरात पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. या रोगांमुळे अनेक नागरिक आजारी पडले असून काहींना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिरोंचा तालुक्यातील अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री शारिकभाई शेख,धानोरा तालुका अध्यक्ष साजन गुंडावार तसेच महामंत्री विजय कुमरे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना कळविले असता या गंभीर समस्येवर मा.खा.डॉ. नेते यांनी तातडीने पुढाकार घेत जिल्हा आरोग्य अधिकारी मान.श्री. प्रतापसिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

मा.खा.डॉ. नेते यांनी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, “डेंगू-मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना हाती घ्या. साचलेल्या पाण्याची तातडीने फवारणी करा, गावागावात जनजागृती मोहीम राबवा, रुग्णांची तपासणी व सर्वेक्षण करा, तसेच आरोग्य पथक थेट गावांपर्यंत पोहोचवून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्या.”

यावेळी डॉ. नेते यांनी ठामपणे सांगितले की, “आरोग्यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत नागरिकांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला आवश्यक ती मदत आणि सुविधा मिळालीच पाहिजे.”

या हस्तक्षेपामुळे धानोरा व सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून आरोग्य विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.