अप्पर डिप्पर लिगचे भंडारेश्वर फोर्ट ठरले चॅम्पियन– करंडक स्पर्धेत ओम गणेश मंडळाची बाजी

372

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा संपादक)

गडचिरोली :- दरवर्षीप्रमाणे यंदाही अप्पर डिप्पर व्हॉट्स अॅप ग्रृपतर्फे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्यांसाठी 14 ते 26 जानेवारी या कालावधीत अप्पर डिप्पर प्रिमीयर लीग तसेच करंडक क्रिकेट स्पर्धा पार पडली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सदर दोन्ही स्पर्धेचा थाटात समारोप करण्यात आला. यात संघमालक निखील मंडलवार यांच्या भंडारेश्वर फोर्ट या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत चॅम्पियन चषक पटकाविले.

तर डॉ. यशवंत दुर्गे यांचा चपराळा फॉरेस्ट संघ उपविजेता ठरला. तर करंडक स्पर्धेत गडचिरोली येथील ओम गणेश मंडळ संघाने बाजी मारली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संघ द्वितीय तर गडचिरोली क्रिकेट क्लबने तृतीय स्थान पटकाविले.
पत्रकारांच्या व्हॉट्स अॅप ग्रूपद्वारे खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी तसेच सृदृढ आरोग्यासाठी अप्पर डिप्पर प्रिमीयर लिग स्पर्धा दरवर्षी आयोजित केले जाते.

याअंतर्गत यावर्षी या लिग स्पर्धेत एकूण 4 संघानी प्रवेश नोंदविला होता. यात संघमालक निखील मंडलवार यांचे भंडारेश्वर फोर्ट, संघमालक डॉ. यशवंत दुर्गे यांचे चपराळा फॉरेस्ट, अनुराग पिपरे यांची गुरवळा सफारी तर बलराम सोमनानी यांची मुतनूर मॅजिक आदी संघाचा समावेश होता. 14 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत सदर चारही संघानी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यात भंडारेश्वर फोर्ट संघाने अव्वल, चपराळा संघ द्वितीय तर गुरवळा संघ तृतीय तर मुतनूर मॅजिक संघाने चौथे स्थान पटकाविले. दुसरीकडे करंडक स्पर्धेत गडचिरोलीसह विविध जिल्ह्यातील एकूण 48 संघानी सहभाग नोंदविला होता. प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या अंतिम सामन्यात गडचिरोलीच्या ओम गणेश मंडळाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संघावर मात करीत अव्वल स्थान पटकाविले. तर तृतीय स्थान गडचिरोली क्रिकेट क्लबने पटकाविले.

शहरातील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी मैदानावर सदर क्रिकेट स्पर्धेचा प्रजासत्ताक दिनी थाटात समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रुडे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी बदलमवार, नप उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, अनुराग पिपरे, निखिल मंडलवार, डॉ. प्रशांत चलाख आदि उपस्थित होते.

विजेत्या संघाना स्व. वासुदेवजी शिंगाडे स्मृतीप्रित्यर्थ रोख रक्कम तसेच चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता अप्पर डिप्पर व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.