एटापल्ली सुरजागड लोह खाण रद्द करा ग्रामसभेचा आवाज विधिमंडळात गाजला…

0
489

 

गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खदानीला स्थानिक आदिवासी समाज आणि ग्रामसभांचा प्रखर आणि कायदेशीर विरोध आहे. त्यामुळे सदरची लोह खदान तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या मागणीच्या माध्यमातून पहील्यांदाच पेसा क्षेत्रातील ग्रामसभांचा खाण विरोधातील आवाज पहील्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळात ऊमटला आहे.
विधीमंडळ अधिवेशना मध्ये आमदार भाई जयंत पाटील यांनी ही मागणी सभागृहात केली असून त्यांनी म्हटले की गेले अनेक वर्षे स्थानिक आदिवासी समाज आणि ग्रामसभांचा सुरजागड येथील लोह खदानीला कायदेशीररित्या विरोध आहे. रोजगार आणि विकासाच्या नावाखाली जंगल व पहाड खोदून स्थानिकांचा जंगलापासूनचा मिळणारा मोठा रोजगार नष्ट करण्याचा घात घातला जात आहे. त्यामुळे हे तात्काळ बंद करण्यासाठी सदरची खदान तात्काळ रद्द करुन स्थानिक ग्रामसभांना आणि आदिवासी समाजाला दिलासा सरकारने द्यावा अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी सभागृहात केली आहे.
यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील जवळ-जवळ सर्वच राजकीय लोकांनी जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी सुरजागड लोह खाणीचे समर्थन केले आहे. परंतु रोजगार निर्मिती हे केवळ स्वप्नरंजन ठरले असुन वनाधारित रोजगार यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. कंपनीच्या अर्थपूर्ण प्रभावात येऊन राजकिय लोकांनी समर्थन हे स्थानिक जनतेला पटणारे नसल्यामुळे आणि आमदार भाई जयंत पाटील यांनी केलेल्या या मागणीमुळे एट्टापल्ली आणि भामरागड तालुक्यातील ग्रामसभांनी मागिल अनेक वर्षांपासून सुरजागड खदानी विरोधात चालविलेल्या आंदोलनाचा आवाज विधिमंडळात पोहचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here