गोजोली आरोग्य उपकेंद्राचा वाली कोण ?

0
695

शेखर बोंनगिरवार तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेले गोजोली येथे आरोग्य उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय बनला असून या आरोग्य केंद्रात निवासी कर्मचारी पद कार्यरत असताना सुद्धा निवासी राहत नसल्याने या केंद्राअंतर्गत अनेक समस्या आ वासून उभ्या असताना याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या उपकेंद्राचा वाली कोण ? असे प्रश्न आता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे.
तालुक्यातील धाबा हे सर्वात मोठे आरोग्य केंद्र आहे. याच केंद्राअंतर्गत गोजोली येथे उपकेंद्र आहे या उपकेंद्र अंतर्गत एकूण नऊ गावे समाविष्ट आहेत. या समाविष्ट गावातील नागरिकांची आरोग्य विषयक जबाबदारी या आरोग्य उप केंद्राची आहे. असे असताना देखील समाविष्ट गावातील नागरिक मात्र आरोग्य सेवेपासून वंचित राहिले आहे. या आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली निवासी मुख्य आरोग्य सेविका ही मुख्यालयीन राहत नसून, तालुका ठिकाणी राहत असल्याने नेहमीच दुपारी बारा ते एक वाजता आरोग्य केंद्रात येत असते. लगेच पाच वाजायच्या आत हे आरोग्य उपकेंद्र बंद केल्या जाते. यानंतर या केंद्रात कुणीच फिरकत नसल्याने रात्र वेळी या केंद्रात शुकशुकाट दिसून येते.
कधी काळी रात्री-अपरात्री काही आजार उद्भवल्यास प्राथमिक उपचारासाठी सुद्धा तालुका ठिकाणी जावे लागत असल्याने खाजगी वाहनासाठी बरेच पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या आरोग्य सेविकेच्या काळात रुग्णाला वेळेवर उपचार कधीच मिळत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आरोग्य सेविकेच्या या मनमानी कारभारामुळे समाविष्ट गावातील नागरिक मात्र उपचाराअभावी त्रस्त झाले आहे. सदर प्रकरणाबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ कसा? या सर्व मनमानी कारभाराची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

याच केंद्रांतर्गत प्रसूती केंद्र आहे, मात्र यासाठी आरोग्य सेविका (प्रसूती) ची उपलब्धता नसल्याने हे केंद्र आता नावालाच उरले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रसूती केंद्र शोभेची वास्तु ठरली आहे. एकेकाळी हेच आरोग्य उपकेंद्र प्रसूतीसाठी जिल्ह्यात नावाजलेले होते. यानंतर आता मात्र हे आरोग्य उपकेंद्र फक्त नावालाच उरले असून समाविष्ट गावातील नागरिकांना प्रसूतीसाठी अनेक त्रास सहन करावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेस खाजगी वाहनांना अधिकचे पैसे मोजून प्रसूतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. आधीच कोरोना या आजाराने भयभीत असलेल्या जनतेला गावात उपचार उपलब्ध होत नसल्याने रिक्त पद त्वरित भरण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

कोट –
आरोग्य सेविका ही केंद्रात निवासी असायला पाहिजे, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

— डॉ. दिनेश चकोले
( T.M.O )

निवासी आरोग्य सेविका ही नुसती नावालाच असून, गावात नाहीच्या बरोबरीने सेवा देत आहे. त्यामुळे या आरोग्य सेविकेला निलंबित करून नवीन निवासी सेविका देण्यात यावी. व आरोग्य सेविका(प्रसूती) हे रिक्त पद त्वरित भरण्यात यावे.
— गिरिधर कोटनाके
सरपंच, ग्रामपंचायत गोजोली,

दिलेल्या वेळेत लसीकरण होत नाही
आरोग्य सेविकेच्या कामचुकारपणा मुळे अनेकदा स्तनदा व गरोदर महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर महिलांना लसीकरण ठरविण्यात आलेल्या दिवशी होत नसून नंतर हेच लसीकरण दोन तीन दिवसांनी दिल्या जाते, त्यामुळे अनेकदा गरोदर व स्तनदा मातांना दिवसभर लसीकरणासाठी वाट बघून परत घरी जावे लागत असल्याची चर्चा उपकेंद्र अंतर्गत समाविष्ट गावात सुरू आहे.

आरोग्य सेवक कर्तव्यावर नशेत
याच उप केंद्र अंतर्गत आरोग्य सेवक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी सतत दारूच्या नशेत राहत असल्याने या सुद्धा कर्मचाऱ्यांकडून पाहिजे ती सेवा उपलब्ध होत नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या सबंध बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सदर केंद्रातील कर्मचाऱ्यांची योग्य चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here