सुरज पी. दहागावकर (मुख्य संपादक)
गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर (चेकबापूर) या छोट्याशा गावातील धनराज सत्यवान हिंगाने यांनी आपल्या कठोर मेहनतीने, असीम जिद्दीने आणि अपयशावर मात करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर स्वतःचे नाव कोरले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनी अठरा विश्व दारिद्र्याला न जुमानता आपल्या स्वप्नांच्या मागे जिद्दीने लागून अखेर ते स्वप्न साकारले. त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा प्रत्येकाला अभिमान वाटत आहे.
धनराज याचे वडील सत्यवान हिंगाने हे शेतकरी असून, त्यांनी आपल्या मर्यादित उत्पन्नातून मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी खस्ता खाल्ल्या. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून त्यांनी धनराजचे शिक्षण चालू ठेवले, तर त्याच्या आईने घर सांभाळताना स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. अनेकदा स्वतःच्या सुखाचा त्याग करून त्यांनी धनराजला शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक, मानसिक आणि भावनिक आधार दिला. त्यांच्या या त्यागामुळे धनराजला आपले स्वप्न पुर्ण करता आले.
धनराज याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आणि बारावीपर्यंतचे शिक्षण जनता कॉलेज, गोंडपिपरी येथे झाले. त्यानंतर चंद्रपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोठा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्याने पुण्याला जाण्याचा निश्चय केला, जिथे स्पर्धा परीक्षेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पुण्यात काही वर्षे राहून त्याने तिथल्या स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला झोकून दिले. तिथे राहण्याचा खर्च, अभ्यासाची पुस्तके यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबाने मोठी कसरत केली. पुण्यातील या काळात त्याने आपली तयारी अधिक मजबूत केली, पण यश मिळवण्याआधी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले.
पुढे त्याने कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासेसला जाण्याऐवजी स्वतःच्या अभ्यासावर भर दिला. गावात लायब्ररी नव्हती, म्हणून तो चंद्रपूरला जाऊन तिथल्या लायब्ररीत तासन् तास अभ्यास करायचा. त्याचे मित्रही त्याच्या या प्रवासात महत्त्वाचे सहकारी ठरले. मित्रांनी त्याला नोट्स पुरवल्या, ग्रुप स्टडीमध्ये मदत केली आणि कठीण प्रसंगी त्यांचा आत्मविश्वास वाढवला. तयारीदरम्यान त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात धनराज यांना अपयशाचा सामना वारंवार करावा लागला.मुलाखतीपर्यंत पोहोचूनही निवड न होणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. तब्बल २० हून अधिक वेळा अपयश मिळाले, पण त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत त्याने आपली तयारी अधिक तीव्र केली. पुण्यातील कष्टाच्या काळात आणि आई-वडिलांच्या त्यागामुळे त्यांच्यातील जिद्द कायम राहिली.
सातत्य, कष्ट आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अखेर २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत धनराजने यश मिळवले आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. हे यश त्याच्या आई-वडिलांच्या त्यागाचे आणि पुण्यातील संघर्षमय काळाचे फळ होते. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी अभिमानाचा होता. इंडिया दस्तक न्युज टीव्हीशी बोलताना धनराजने सांगितले कि, “माझे नाव पोलीस उपनिरीक्षक म्हणून पाहिल्यावर मला विश्वासच बसला नाही. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले.” हा क्षण केवळ त्याच्यासाठीच नाही, तर त्याच्या कुटुंबासाठी आणि गावासाठीही गौरवाचा होता.
धनराज हिंगाने यांचा हा प्रवास तरुणांना दाखवतो की आई-वडिलांचा त्याग, स्वतःची मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. त्याच्या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण आहे आणि त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जिद्दीला आणि त्यांच्या कुटुंबाच्या समर्पणाला सलाम!