बेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…

1086

नागपूर:-

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील साळवा येथील एक तरुण नव्वदच्या दशकात रोजगार शोधत नागपूरला आला. सतरा वर्ष मेहनत करून आज स्वतःची कंपनी उभी केली. त्याने उभी केलेल्या मातोश्री प्रभा सिटी डेव्हलपर्स या कंपनीत आज दोन हजारांपेक्षा जास्त कामगार काम करतात. विशेष म्हणजे लॉक डाऊन मध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या पण त्याने सर्वाना सांभाळून घेऊन सर्वाना नोकरीवर ठेवलं. ही यशोगाथा आहे ध्येयवेड्या प्रमोद घरडे यांची…

प्रमोद यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्थानिक खापर्डे विद्यालयात घेतले. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर शेती केली. कुही-साळवा मार्गावर प्रवाशांची गाडी चालविली. त्यानंतर थ्रेशर मशिनचा व्यवसाय केला. मात्र, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द मनात होती.

त्यामुळे त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ते बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या शोधात १९९३ साली दाखल झाले. वॉलकंपाऊंड बांधकामापासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.

आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिकता, कर्तव्यनीष्ठता, एकाग्रता व सर्वात चांगले काम (बेस्ट) करुन दाखविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोबतच आईवडिलांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून काम केले, तर नीश्चीतच प्रत्येक जन आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे होऊ शकतो, असे प्रमोद सांगतात. बांधकाम व्यवसायात दिवसरात्र काम करून सर्वात चांगला बंगला, इमारत, फ्लॅट स्कीम, रोहाऊस तयार करून ग्राहकांना संपूर्ण सुविधा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते. याव्यतिरिक्त कोणत्याही कामात वेळ वाया घालवत नाही. वॉलकंपाऊंडच्या कामापासून अकरा मजली इमारतीचे बांधकाम केले. नागपूर शहरात झिंगाबाई टाकळी, मानकापूरपासून भरतवाड्यापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त विविध फ्लॅट उभारले. त्यातच आज त्यांच्या कंपनीत साईट काँट्रॅक्टर, सुपरवायझर, इंजिनियर, मिस्त्री, कारागिर, चालक, कारागीर, टेकनिकल वर्कर, मजूर, असे जवळपास दोन हजार सहकारी काम करतात. लॉकडाऊनच्या काळातही त्या सर्वांना सांभाळून घेतल्याचे घरडे सांगतात.