राष्ट्रसंत मानव धर्माचे महान प्रचारक – डॉ. भास्करराव विघे -विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त व्याख्यान…

141

कार्यकारी संपादक दिनेश मंडपे

नागपूर :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानव धर्माचे महान प्रचारक होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, दि.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी विशेष व्याख्यान पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या वतीने आयोजित व्याख्यानात डॉ. भास्करराव विघे मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांनी भूषविले, अतिथी वक्ता म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे, अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विश्वबंधुत्वाची संकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘सगळास कळो मानवता राष्ट्रभावना’ या विचाराने प्रेरित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रभक्ती शिकविणारे संत होते, असे डॉ. विघे पुढे बोलताना म्हणाले. देशासाठी तीळ तीळ तुटणारा महात्मा असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९२० नंतर इंग्रजांसोबत संघर्षाच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जागवण्यासाठी मैदानात उतरले. स्वातंत्र्याची चळवळ केवळ शहरापर्यंत मर्यादित असताना खेड्यातील माणसाला जागे करण्यासाठी राष्ट्रसंतांची खंजिरी कळाळली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याचा महाराजांनी सर्वांना संदेश दिला. जेलमध्येही गेले, हा महात्मा साधा नाही हे इंग्रजांना देखील कळले होते. ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना’ असे महाराजांचे बोल जनतेपर्यंत पोहोचत असल्याने इंग्रजांनी त्यांना रायपूरच्या जेलमध्ये बंद केले होते. देशासाठी जेलमध्ये जाणारे तुकडोजी महाराज हे पहिले संत होते. सर्व नेत्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर देशाला जागृत करण्याचे कार्य महाराजांनी केले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात तुकडोजी महाराज यांचा फार मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर देखील ‘उठा हो दिवस निघाला नवा’ असा संदेश देत राष्ट्रसंतांनी देशातील प्रत्येक गाव खेडे सुंदर बनावे म्हणून ग्राम सुधारण्यासाठी भजने लिहिली. खेडी सुंदर झाली तरच देश सुंदर होईल, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून स्वयंपूर्ण गावाची संकल्पना मांडली, आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी देशसेवेसाठी खर्च केला, असे विघे म्हणाले. सर्व धर्म संप्रदायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले, कारण त्यांचा ‘या भारतात बंधुभाव वसु दे…’ हा केवळ एकच उद्देश होता. विश्वाच्या शांतीसाठी राष्ट्रसंतांनी कार्य केले. जपान येथील जागतिक शांती परिषदेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत परिषदेचे अध्यक्षस्थान देखील भूषविले. जपान येथील जागतिक शांती परिषदेत देखील ‘ये विश्व के चालाक प्रभू …’, ‘हर देश मे हर देश मे तू…’ अशी भजने सादर करत त्यांनी संपूर्ण जगाला चकित केले. असे राष्ट्रभक्ती शिकविणारे तुकडोजी महाराज हे महान संत होते, असे ते म्हणाले. विद्यापीठाने महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ गीत हे विश्वगीत झाले असल्याचे डॉ. विघे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तत्त्वज्ञानातून विज्ञान शोधण्याची गरज व्यक्त केली. स्वातंत्र्यापूर्वी असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार स्वातंत्र्यानंतर बदलले यावरून राष्ट्रसंतांचे विचार हे प्रासंगिक आहेत. सोबतच ग्रामगीतेत अनेक विज्ञान लपले असून समाजाच्या हितासाठी विज्ञान आपण शोधले पाहिजे. महाराजांनी गावाच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले. महाराजांचे सामाजिक विचार आज अत्यंत आवश्यक असून सामाजिक विषमता ही केवळ राष्ट्रसंतांच्या विचारातून दूर होईल, असे डॉ. ढोबळे म्हणाले. प्रास्ताविक करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी प्रत्येक धर्मात मानवतेची भावना असल्याचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सर्व धर्मीय प्रार्थनेतून दिला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले तर आभार डॉ. देवमन कामडी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल उईके, प्रा. दिव्या राजुरकर, डॉ. जयेंद्र मेश्राम, कल्याणी मेश्राम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राधिकारणी सदस्य, सर्व अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता, शैक्षणिक विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.