प्रत्येक पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याची माझी जबाबदारी
गडचिरोली
प्रत्येक पूरग्रस्ताला वेळेत आणि आवश्यक मदत मिळणारच तेव्हा, पूरस्थिती नंतर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांशी बोलताना केले. गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे 17033 हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे पुरामुळे नुकसान झाले आहे. तसेच 4000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून वेळेत पंचनामे करून प्रत्येक पूरग्रस्ताला न्याय देण्यासाठी मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून जबाबदार आहे असा दिलासा विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिला. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसेच आता पूरस्थिती ओसरल्यानंतर पुराच्या पाण्यामुळे तसेच दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. या दुहेरी संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे असे ते पुढे म्हणाले.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पूरानंतरच्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पूरस्थिती बाबत मंत्री महोदयांना माहिती दिली. पूरामुळे घरात पाणी शिरल्यामुळे 4174 लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुरामुळे 17033 हेक्टर आर शेती पाण्यात गेली असून शासन आवश्यक उपाययोजना करत असून लवकरच शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येणार असून 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे रुपये 5 हजार प्रमाणे तातडीची मदत देण्याची व्यवस्था करा असे निर्देश मंत्रीमहोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पूरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले तसेच साहित्याची, जनावरे यांची नासधुस झाली असेल त्याबाबत प्रशासनाने पंचनामे करुन याबाबतचा अहवाल शासनास द्यावा. पुरामुळे घरांचे नुकसान झाल्यास तसेच पडझड झाल्यास पंचनाम्यानंतर शासनातर्फे रुपये 95 हजार देण्यात येतात. तसेच शेती करीता दर हेक्टरी रुपये 18 हजार प्रमाणे मदत करण्यात येणार आहे. त्याकरीता प्रत्यक्ष शेतावर जाऊन बारकाईने पंचनामे करुन कोणताही शेतकरी सुटणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे असे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले. तसेच एकाच घरात राहणारे वेगवेगळे कुटूंब त्यांच्या सातबारा नुसार ज्यांची शेती वेगवेगळी आहे त्यांना समान मदत मिळेल अशी प्रक्रिया राबविण्यात यावी.
जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून वीज प्रवाह पूर्ववत करणे, नुकसानीचे पंचनामे, रस्त्यावरील व घरातील गाळ काढणे, पिण्याचे स्वच्छ पाणी पूरविणे, साथरोग पसरू नये यासाठी फवारणी व ब्लिचींग पावडर टाकणे, शिबीरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आदी कार्य मोठ्या प्रमाणत सुरू झाले आहे त्याचा पाठपुरावा करून लोकांच्या अडचणी सोडवा याबाबत निर्देश मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.