जिवती (ता.प्र) : फुले,शाहू,आंबेडकर, साठे स्मारक समितीच्या वतीने आयोजित स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव, बोधिसत्व,महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्सव जिवतीत मोठ्या उत्साहात पार पडली. पंचशील बौद्ध विहार येथील ध्वजारोहण व्यंकटी कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यानंतर पंचशील बुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या रॅलीत तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव, भगिनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले. रॅलीतील जय भीम च्या जयघोषाने पूर्ण शहर दुमदुमले. त्यांच्या हातातील निळे व पंचशील ध्वज लक्ष वेधून घेत होते. भीम गीतांवर तरुणाईसह वृध्दही थिरकले यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील ध्वजारोहण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सोमाजी गोंडाने यांच्या हस्ते पार पाडले. प्रमुख मार्गदर्शक ॲड.सचिन मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पूर्ण आयुष्य देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहेत. आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक आहेत. बाबासाहेबांच्या कार्याचा चुकीचा इतिहास मांडन्यासाठी मनुवादी विचारधारा सक्रिय असल्याने बाबासाहेबांच्या सच्चा अनुयायांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.सचिन मेकाले यांनी केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात सर्वसमावेशक बाबासाहेब अप्रतिम मांडला.
याप्रसंगी मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने, न.पं.जिवतीचे गटनेते अमर राठोड, सामाजिक कार्यकर्ता मेहबूब शेख, न.पं.जिवतीचे उपनगराध्यक्ष डॉ.अंकुश गोतावळे, सामाजिक कार्यकर्ता किरण पवार, सामाजिक कार्यकर्ता अशपाक शेख आदी मान्यवर मार्गदर्शन केले. दरम्यान सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात व्यंकटी कांबळे यांचा सपत्नीक शाल व कपडे रुपी अहेर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शरद वाठोरे, सूत्रसंचालन नभिलास भगत यांनी तर आभार प्रदर्शन चंदू रोकडे यांनी केले.
विशेष म्हणजे मार्गदर्शन पर कार्यक्रम झाल्यानंतर रात्रौ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, तथा गायक मनोज राजा गोसावी यांचा बुद्ध भिम गीताचा प्रबोधनाचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. याचे संचालन विदर्भाचा बुलंद आवाज प्रबोधनकार संभाजी ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, मातोश्री रमाबाई महिला मंडळ, जिवतीचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.