पायाभूत सुविधांचा विकास करून दोन वर्षात रस्ते प्रश्न मार्गी लावणार : नितीन गडकरी

425

 

गडचिरोली:
प्रतिनिधी नितेश खडसे

७७७ कोटींचे रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन नितीनजी गडकरी व पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न

 गडचिरोली जिल्ह्यातील 777 कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांचा उद्घाटन आणि कोनशिला समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाला. यावेळी संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की जिल्हयातील प्रमुख रस्त्यांचा विकास करून तसेच इतर पायाभूत सुविधा उभारून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा येत्या दोन वर्षात बदलणार आहे. तर यावेळी राज्याचे नगरविकास तथा जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील दुर्गम विकासच जिल्हयाची असलेली नक्षल ओळख पुसेल असे प्रतिपादन केले. गेल्या काही कालावधीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारा 541 किलोमीटर लांबीच्या 44 कामांना मंजुरी देण्यात आली यासाठी 1740 कोटी रुपयांचा खर्च झाला तसेच येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यात 103 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित असून त्यासाठी 402 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या सर्व कामांमुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून या जिल्ह्याचा चेहरामोहरा येत्या दोन वर्षांत बदलण्यास मदत होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारने विकासावर भर दिला असून विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल असे प्रतिपादन केले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात तब्बल ७७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बनलेले व बनत असलेले रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन होत असताना ही जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अहेरी, भामरागड, लाहेरी आदी दुर्गम भागांमधील या रस्ते व पुलांमुळे बारमाही या परिसराचा संपर्क टिकून राहील, वाहतूक अबाधित राहील, तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्थाही अधिक बळकट करता येईल. गडचिरोलीला विकासाच्या मुख्य धारेत आणून नक्षलवादाचा कणा मोडणे, याला सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.
यावेळी बोलताना श्री नितीन गडकरी यांनी देसाईगंज पासून ब्रह्मपुरी पर्यंत ब्रॉडगेज मेट्रो निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला यासाठी त्यांनी राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा केली या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन यात बचत होईल तसेच श्री गडकरी यांनी तांदळापासून इथेनॉल बनवणारे प्रकल्प सुरू करायला गडचिरोलीमध्ये खूप संधी असल्याचे देखील नमूद केले. यावेळी ते पुढे म्हणाले की नुकतेच केंद्र सरकारने अगरबत्ती आयातीवर बंदी घातली आहे याचा फायदा घेऊन अगरबत्ती उत्पादन आणि बांबू क्षेत्रांमध्ये सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून 10,000 युवकांना प्रशिक्षित करून रोजगार देणे शक्य आहेत व या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या जिल्ह्यांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून हा जिल्हा एव्हिएशन इंधनाचे केंद्र म्हणून बनवणे देखील शक्य आहे असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना रस्ते विकास आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग म्हणाले की जास्तीत जास्त संपर्क रस्ते बनवल्याने या भागातील नक्षली प्रभाव कमी होईल.या समारंभात बोलताना महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नमूद केले की आज उद्घाटन होत असलेला विकास कामांमुळे दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भागांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल आणि महाराष्ट्र तेलंगानाशी जोडला जाईल.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, डॉ.रामदास अंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, केंद्र शासनाचे सचिव, अतिरीक्त सचिव तसेच राष्ट्रीय महामार्गचे गडचिरोली कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपिस्थित होते.