Home Breaking News प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू; परिसरात तीव्र संताप…

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू; परिसरात तीव्र संताप…

662

आमगाव महाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे सर्पदंशाने चिमुकलीचा मृत्यू; परिसरात तीव्र संताप


प्रतिनिधी गौरव बुरांडे |
चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित निष्काळजीपणा व असंवेदनशील वर्तनामुळे एका निरागस चिमुकलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायरा तानाजी कुकडकर (वय अंदाजे पाच वर्षे) हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोग्य व्यवस्थेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायरा हिला घराजवळ सर्पदंश झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तातडीने आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मुलीच्या आईने डॉक्टरांना स्पष्ट शब्दांत “माझ्या मुलीला सर्पदंश झाला आहे” असे सांगून तातडीने उपचार करण्याची विनंती केली होती. मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही सखोल तपासणी न करता किंवा आवश्यक तातडीचा प्रथमोपचार न देता नोंदवहीत ‘अज्ञात चावा’ अशी नोंद केली आणि पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्याची पावती दिली.
उपचारात झालेल्या या विलंबामुळे मुलीची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर नायरा हिला तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर सर्पदंशाची शक्यता स्पष्ट केली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, “स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य वेळी सर्पदंशावरील प्रतिविष इंजेक्शन व आवश्यक उपचार दिले असते, तर काही महत्त्वाचा वेळ मिळाला असता आणि चिमुकलीचा जीव वाचण्याची शक्यता अधिक होती.”
दरम्यान, उपचार सुरू असतानाच नायरा हिची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निरागस बालिकेचा जीव केवळ निष्काळजीपणामुळे गेला, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
नागरिकांची कारवाईची मागणी
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशासारख्या गंभीर प्रकरणांसाठी आवश्यक औषधे व साधनसामग्री उपलब्ध आहेत का, तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही सामाजिक संघटनांनी संबंधित डॉक्टरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपासणी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असतात. अशा वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अशा प्रकारची कथित निष्काळजीपणा गंभीर मानला जात आहे.
निरागस नायरा हिच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला असून, “आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार?” असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या घटनेची पारदर्शक चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

Don`t copy text!