Home Breaking News “एटीएममधील बनावट नोटांमुळे उघड झाला मोठा रॅकेट”

“एटीएममधील बनावट नोटांमुळे उघड झाला मोठा रॅकेट”

46

“एटीएममधील बनावट नोटांमुळे उघड झाला मोठा रॅकेट”

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई; नागपुरातून हायटेक बनावट नोटा छपाई अड्डा उद्ध्वस्त

जिल्हा संपादक नितेश खडसे
गडचिरोली : जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. पोस्टे गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरला जाणारा हायटेक प्रिंटर, बॉण्ड पेपर, अर्धवट छापलेल्या नोटा व इतर साहित्य असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणाचा पर्दाफाश बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये जमा झालेल्या बनावट नोटांमुळे झाला. शाखा व्यवस्थापक प्रतिक बाबाराव अनासने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात प्रमोद टिकाराम कोवे (रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) याने 100 रुपयांच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
चौकशीत आरोपीने या नोटा आदित्य जनार्धन रेचनकर (रा. आरमोरी रोड, गडचिरोली) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. पुढील तपासात ‘चिटू’ नावाच्या व्यक्तीकडून नागपूर येथे बनावट नोटा आणल्या जात असल्याची माहिती समोर आली.
यानंतर पोस्टे गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक नागपूर येथे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्रिमूर्ती नगर परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान बनावट चलनी नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एचपी कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर, अर्धवट छापलेल्या नोटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत मयुर लक्ष्मीकांत डोईजळ, आदित्य लक्ष्मीकांत डोईजड व आदित्य जनार्धन रेचनकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटिंग साहित्य, कोरे बॉण्ड पेपर व इतर साहित्य असा एकूण 39,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर चारही आरोपींना 22 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोनि विनोद चव्हाण करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक श्री. कार्तिक मधिरा, श्री. गोकुल राज जी. व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, प्रभारी अधिकारी विनोद चव्हाण, सपोनि भगतसिंग दुलत, पोउपनि शिवाजी देशमुख व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Don`t copy text!