Home Breaking News आधारभूत धान खरेदी केंद्र रेगडी TDC येथे शेतकऱ्यांची आर्थिक लूट; तहसीलदारांकडे तक्रार...

आधारभूत धान खरेदी केंद्र रेगडी TDC येथे शेतकऱ्यांची आर्थिक लूट; तहसीलदारांकडे तक्रार दाखल…

434

आधारभूत धान खरेदी केंद्र रेगडी TDC येथे शेतकऱ्यांची आर्थिक लूट; तहसीलदारांकडे तक्रार दाखल
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे सुरू असलेल्या TDC आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून या प्रकरणी अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी देण्यात आली असून संबंधित केंद्राविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार आधारभूत धान खरेदी करताना ४० किलो धानास ६०० ग्रॅम एवढी प्रमाणित कपात करण्याचे नियम आहेत. मात्र रेगडी येथील TDC केंद्रात या नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून तब्बल ४१ किलो ८०० ग्रॅम धान घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे थेट आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसून वजन काट्यांमध्ये अनियमितता असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना धानाची उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे केंद्रातील संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, धान विक्रीसाठी मोठ्या आशेने केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना नियमांपेक्षा जास्त कपात सहन करावी लागत आहे. अनेकांनी यापूर्वी तोंडी आक्षेप घेतला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित केंद्र चालकावर गुन्हा नोंद करावा तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी रेगडी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!