14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्हा संपादक नितेश खडसे

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असताना छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बोलेरो कॅम्पर वाहनासह तब्बल 14 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे आरोपी बनावट नंबर प्लेट लावून दारूची वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार अवैध दारू विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली आणि पोलीस स्टेशन अहेरी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर एक बोलेरो कॅम्पर वाहन (क्र. MH 12 SX 6981) संशयास्पद अवस्थेत उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 46 बॉक्समध्ये भरलेले 1104 बिअर कॅन, 2200 देशी दारूच्या निपा तसेच 120 रॉयल स्टॅग व्हिस्की बॅरेल असा मोठा साठा जप्त केला. यासोबतच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो कॅम्परही जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 14,87,200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.







