गडचिरोली नगरपरिषद सभापती निवडणुकीत महायुतीची सत्ता
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी रणनीती
जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली :गडचिरोली नगरपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सर्वच महत्त्वाच्या समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, या यशामागे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची निर्णायक भूमिका व प्रभावी नेतृत्व महत्त्वाचे ठरले.
सभापती पदाच्या वाटपात मुक्तेश्वर काटावे यांची आरोग्य सभापती म्हणून निवड करण्यात आली. नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्याकडे अर्थ सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अनिल कुणघाडकर यांची बांधकाम सभापती, तर हर्षल गेडाम यांची शिक्षण सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लीलाधर भरडकर यांची पाणीपुरवठा सभापती,
महिला व बालकल्याण सभापतीपदी सीमा कन्नमवार, तर महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून शिल्पा हेमके यांची निवड करण्यात आली.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महायुतीतील समन्वय राखत नगरसेवकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महायुतीची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. संघटनात्मक ताकद, अनुभव आणि नेतृत्वगुण यामुळेच ही निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी ठरल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीप्रसंगी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या या विजयामुळे गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, आगामी काळात नगरपरिषदेमार्फत विकासकामांना गती मिळणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत.







