अहेरी पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या
प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
अहेरी : मौजा नागेपल्ली येथील रहिवासी रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या हत्येप्रकरणी अहेरी पोलिसांनी फरार असलेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. समय्या मलय्या सुंकरी (वय ३५ वर्ष, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र तंगडपल्लीवार (वय ५०) हे आपल्या पत्नीला आलापल्ली येथील प्रगती नागरी पतसंस्थेत आरडीचे पैसे भरण्यासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने अहेरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
१९ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास आलापल्ली ते सिरोंचा महामार्गावरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तपासणीअंती हा मृतदेह रवींद्र तंगडपल्लीवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती.
या घटनेचे गांभीर्य ओळखून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मदिरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलीस पथक तयार करण्यात आले. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी समय्या मलय्या सुंकरी याला संशयावरून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला २० जानेवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे करत आहेत.







