गडचिरोली:- भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूलभूत मूल्यांना साक्षात उतरवणारा सत्यशोधक विवाह सोहळा ३० जून २०२५ रोजी गडचिरोलीच्या सेमाना बायपास रोडवरील सृष्टी सेलिब्रेशन हॉल येथे अत्यंत साधेपणाने, पण वैचारिक तेजाने पार पडला.
सीमा बाजीराव मडावी आणि सतिश भैय्याजी कुसराम या नवदाम्पत्याने कोणताही धार्मिक विधी, कर्मकांड, पुजारी, देवपूजा वा हुंडा न घेता, फुले-आंबेडकरी विचारधारेशी बांधिलकी जपत परस्पर सन्मान, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित विवाह केला. विवाह विधीचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सुनिल कावळे यांनी केले. विवाह प्रमाणपत्र ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या समतेचा घोष करणाऱ्या विवाह सोहळ्यास अनेक सामाजिक चळवळीतील मान्यवर, कार्यकर्ते, पत्रकार आणि साहित्यिक उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये कुसुमताई आलाम, एच टी.भडके (विषमता निर्मूलन दल),रोहिदास राऊत, धर्मानंद मेश्राम, कुनाल कोवे, उमेशदादा उइके, अॅड. सोनाली मेश्राम, विलास निंबोळकर, राज बनसोड, विष्णुकांत गोविंदवाड, आदिनाथ जाधव, वालदे सर, तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते इजामसाय काटेंगे, महेश लाडे, चेतना ताई लाटकर, संगीता तुमडे, डॉ. महेश कोपुलवार, ज्योतीताई जुमनाके, फिरोजकुमार घडसे यांचा उपस्थितीत सहभाग होता. नवविवाहित दाम्पत्याने सार्वजनिकपणे सामाजिक समता, लैंगिक समानता आणि परस्पर सन्मान या मूल्यांची शपथ घेतली. त्यांच्या या वैचारिक निर्णयातून समाजात परिवर्तनाची ठोस प्रेरणा पोहोचली. हा विवाह फक्त वैयक्तिक जीवनप्रसंग नव्हता, तर एक वैचारिक आंदोलन होता जिथे समतेचे मूल्य केवळ उच्चारले गेले नाही, तर कृतीतून साकारले गेले.उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत, सत्यशोधक विवाह ही केवळ पर्यायी पद्धत नसून, सामाजिक न्याय आणि बदलासाठीची आवश्यक चळवळ असल्याचे अधोरेखित केले.
नवदाम्पत्याचा हा निर्णायक पाऊल पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरेल, आणि समाजात समतेच्या मूल्यातून नव्या शक्यतांना वाट मोकळी करेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.