नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना दिले तातडीने काम हाती घेण्याचे निर्देश
प्रतिनिधी सतीश कुसराम गडचिरोली
कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव–जांभूळखेडा–कोरची टी पॉइंट मार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असुन रस्त्ता दलदलीचा, चिखलमय व खड्डेमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनधारकांची दमछाक तर होतच आहे, शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यात अडचणी निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जांभूळखेडा येथील नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
मा.खा.डॉ. नेते म्हणाले –
“हा मार्ग कोरची, गोठणगाव, मालेवाडा, कढोली आणि आसपासच्या शेकडो गावांसाठी जीवनवाहिनी आहे. परंतु या मार्गाची सध्याची अवस्था नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरत आहे. जड वाहतुकीचे ट्रक दोन किलोमीटरपर्यंत रांगेत उभे राहत असून प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे काम तातडीने हाती घेऊन रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.”
मा.खा.डॉ. नेते हे कुरखेडा तालुक्यात दुर्गामातेच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी या दयनीय रस्त्याची पाहणी केली. तत्काळ संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीद्वारे निर्देश देत काम लवकरात लवकर व जलद गतीने पूर्ण करण्यास सांगितले.
या पाहणीदरम्यान जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष कुरखेडा चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, तालुका महामंत्री विनोद नागपूरकर,सुधाकर पेटकर, ग्रा.पंचायत सदस्य गणपत बनसोड,विकास पायडलवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.