संपदाक :- प्रशांत बिट्टूरवार
तळेगाव (जि. वर्धा) येथील वारकरी संप्रदाय कलावंत संमेलनाला उपस्थिती
चंद्रपूर – ‘या जगातील सर्वांत मोठे सिंहासन कोणते, असा प्रश्न कुणाला विचारला तर ते राजवाड्यातील दरबार, संसद किंवा विधानसभेतील खुर्चीचा उल्लेख करतील. पण यक्षाने धर्मराजाला हा प्रश्न विचारला असता, तर यक्षाने ‘जनतेच्या हृदयातील स्थान हेच सर्वांत मोठे सिंहासन आहे’, असे सांगितले असते,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
तळेगाव (जि. वर्धा) येथे वारकरी संप्रदाय कलावंत संमेलन, सत्कार समारंभ तसेच बचतगट महिला मेळावा व भजन साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. मिलींदजी भेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला यावेळी,माजी खासदार रामदासजी तडस,आमदार राजेशजी बकाने , आमदार सुमितजी वानखेडे,भाजपा जिल्हाध्यक्ष वर्धा संजय गाते आदि भाजपा पदाधिकारी,वारकरी बांधव,नागरिक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिभक्त परायण आणि वारीमध्ये वीणा घेऊन जगातील सर्वांगसुंदर स्वर लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार हा सर्वोत्तम उपक्रम आहे. अश्या कार्यक्रमांना रात्री उशिरापर्यंत जनतेने केलेली गर्दी ही खरेच कौतुकास्पद बाब आहे, या शब्दांत आ. मुनगंटीवार यांनी आयोजकांचे कौतुक केले.
मी अर्थमंत्री असताना हरीतवारीची सुरुवात केली. आळंदीच्या वारीच्या पहिल्या पुजेचा मान मला मिळाली. त्यावेळी मी तिथे उपस्थित वारकऱ्यांच्या कपड्यांकडे बारकाईने बघितले तर ते सर्वसामान्य कुटुंबातील वाटत होते. पण त्यांच्या चेहऱ्यांकडे बघितले तर ते जगातील सर्वांत श्रीमंत लोक वाटत होते. त्यांच्या ओठांतून विठ्ठलाचे नाव निघत होते आणि चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणि उत्साह होता, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
भौतिक साधनसंपत्ती वाढत असताना शरीराचे समाधान नक्कीच मिळते, मात्र मनाचे समाधान भौतिक सुखसुविधांमध्ये शक्य नाही. मनाला समाधान देण्याचे सामर्थ्य केवळ भक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले.‘काही दिवसांपूर्वी मी लंडनमध्ये कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार स्वीकारायला गेलो होतो. त्यावेळी तेथे वास्तव्य करणारे महाराष्ट्रातील काही कुटुंब मला भेटायला आले. त्यांच्यासोबत आलेल्या तरुणांना मी ‘भविष्यात काय व्हायचय?’ असा प्रश्न विचारला. त्यातील बहुतांश तरुणांनी मानसोपचारतज्ज्ञ होणार असल्याचे सांगितले. इंग्लंडमध्ये भौतिक सुविधा खूप आहेत, पण मनाच्या समाधानाचे उपाय नाहीत. त्याचे कारण त्यांच्या कुटुंबपद्धतीमध्ये दडले आहे. आपल्याकडे ही परिस्थिती नाहीच्या प्रमाणात आहे. त्याला ईश्वराची भक्ती आणि संस्कार ही मुख्य कारणे आहेत.
आज मोठी सभागृहे आणि रुंद रस्ते उभे राहत आहेत, पण दुर्दैवाने मने मात्र संकुचित होत चालली आहेत. या संकुचिततेवर मात करून समाजात सद्भावना आणि मूल्यसंस्कार रुजविण्याचा एकमेव उपाय म्हणजे हरिभक्त परायणाच्या माध्यमातून संस्कार करणे,असे आ. श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.