Homeनागपूरदीक्षाभूमीवर चार दिवस मनपाचे अहोरात्र सेवाकार्य

दीक्षाभूमीवर चार दिवस मनपाचे अहोरात्र सेवाकार्य

एक हजाराहून कर्मचारी तैनात

स्वच्छतेसह अन्य मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखों बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी २२ ते २५ ऑक्टोबर या चार दिवसांपासून मनपाच्या कर्मचा-यांद्वारे अहोरात्र सेवाकार्य बजावण्यात आले. देशभरातून येणा-या अनुयायांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाद्वारे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडून वेळोवेळी सुविधांचा आढावा घेण्यात आला.

दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभासाठी म.न.पा. तर्फे पुरवावयाचे सुविधा करीता नियुक्त नोडल अधिकारी प्र. उपायुक्त (महसुल) श्री. मिलींद मेश्राम, परिवहन व्यवस्थापक उपायुक्त श्री. सुरेश बगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर यांच्या नेतृत्वात संबंधित विभागांच्या चमूचे निरंतर सेवाकार्यात मौलिक सहकार्य लाभले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे आरोग्य, स्वच्छता, पाणी, विद्युत यासारख्या मुलभूत सुविधांची व्यवस्था दीक्षाभूमीवर करण्यात आली. २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य, विद्युत, जलप्रदाय, आरोग्य अभियांत्रिकी, लोककर्म, अग्निशमन, परिवहन अशा विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात आली. सर्व विभागांच्या एकूण एक हजाराहून अधिक कर्मचा-यांनी दीक्षाभूमीवर आपले सेवाकार्य बजावले. याशिवाय लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात झोनची संपूर्ण चमू संपूर्ण कालावधीमध्ये तैनात होती. परिसरात कचरा जमा राहून घाण होउ नये यासाठी मनपाच्या 7०० च्या वर सफाई कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. तीन पाळींमध्ये सफाई कर्मचा-यांनी निरंतर स्वच्छतेचे कार्य बजावले. याशिवाय दीक्षाभूमीच्या परिसरात, रस्त्यांवर ठिकठिकाणी कचराकुंडींची व्यवस्था करण्यात आली होती. या कचरा कुंड्यांमध्ये जमा होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा गाड्या सतत या मार्गांवरून फिरत्या ठेवण्यात आलेल्या होत्या.
आरोग्य अभियांत्रिकी आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या समन्वयातून मनपाद्वारे महिला व पुरूषांसाठी दीक्षाभूमीचे आतील परिसर, माता कचेरी परिसर, आयटीआय परिसर आणि कारागृहाच्या जागेमध्ये सुमारे ९०० हून अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. दीक्षाभूमी परिसर व माता कचेरी परिसरातील शौचालय सिवर लाईनशी जोडण्यात आले होते. आयटीआय परिसर आणि कारागृहाच्या जागेमधील शौचालयांमुळे दुर्गंधी निर्माण होउ नये याकडे वैज्ञानिक पध्दतीने प्रयत्न करण्यात आले. शौचालयांमुळे निर्माण होणा-या दुर्गंधीपासून सुटका मिळाल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. शौचालयांमधील घाण परिसरात न सोडता त्यासाठी आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे अस्थायी सीवरेज ट्रीटमेंट प्लांटची मध्यवर्ती कारागृह परिसरात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. शौचालयांमधील घाणीच्या विल्हेवाटीसाठी परिसरामध्ये प्रत्येकी 10 हजार लीटर क्षमतेच्या एकूण ६ टँक बसविण्यात आल्या. यामधून केवळ प्रक्रिया केलेल्या सांडपाणी बाहेर सोडून उर्वरित घाणीची विल्हेवाट लावण्यात आली. यामुळे परिसरात कुठलिही दुर्गंधी पसरली नाही व नागरिकांना सुविधांमध्ये अडसर देखील निर्माण झाली नाही. याशिवाय परिसरामध्ये सफाई कर्मचा-यांद्वारे देखील सातत्याने स्वच्छतेचे कार्य करण्यात आले. मनपाद्वारे भारतीय शैलीतील शौचालयांच्या ५८५ नव्या सिट्स बसविण्यात आल्या.

दीक्षाभूमीवर येणा-या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे साहित्यभूषण अण्णाभाउ साठे चौक, कृपलानी चौक, काचीपुरा, काँग्रेस नगर या भागांमध्ये आरोग्य तपासणी व औषध वितरण केंद्र उभारण्यात आले. याशिवाय २४ तास रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती. दीक्षाभूमीकडे येणा-या मार्गांवर ठिकठिकाणी मोठमोठे दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले होते. विविध भागातून अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाद्वारे विशेष ‘आपली बस’ ची व्यवस्था करण्यात आली होती. दीक्षाभूमी मार्गावर पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी १४० नळांची व्यवस्था करण्यात आली. माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे निवारा / विश्रांती गृहाची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर तसेच मार्गांवर पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था राहिल याकडे विद्युत विभागाद्वारे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. नागरिकांना आवश्यक सुविधा आणि त्यांना भेडसावणा-या अडचणी सोडविण्यासाठी साहित्यभूषण अण्णाभाउ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष २४ तास तैनात होते. नियंत्रण कक्षाशेजारी, लक्ष्मीनगर चौक, कृपलानी चौक, अजनी रेल्वे स्टेशन जवळ मोठया एलईडी वरुन अनुयायांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांची चित्रफीत सतत दाखविण्यात आली. जिल्हा प्रशासन तर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातुन सुदधा मनपातर्फे केलेल्या व्यवस्थेची माहिती मोबाईल द्वारे उपलब्ध करुन देण्याची सुविधा करण्यात आलेली होती.
नागपूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने चार दिवस पूर्ण जबाबदारीने निरंतर सेवाकार्य बजावल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण मनपा चमूचे अभिनंदन केले.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!