चंद्रपूर : मंत्रालय लिपिक आणि कर सहायक पदासाठी ३१ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे या उमेदवारांची पात्र होण्याची शक्यता कमी आहे. यात टंकलेखनची अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
एमपीएससीच्या वतीने गट क सेवापूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर मंत्रालय लिपिक आणि कर सहायक यांची पात्रता परीक्षा ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. मात्र, बहुतेक उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींना तसेच आवाक्याबाहेर परीक्षेची पात्रता ठेवल्यामुळे आयोगाला आवश्यकतेनुसार उमेदवार ठरवता आले नाही. परिणामी, आयोगाने सदर परीक्षा रद्द करुन केवळ सात दिवस आधी परिपत्रक काढून सदर परीक्षा ३१ मे रोजी घेण्याचे ठरविले. मात्र, पुन्हा ३१ मे रोजी सदर उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी आल्याने त्यांची पात्र होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामध्ये विशेषतः मुख्य परीक्षा देताना उमेदवारांकडून मराठी शब्द टाईपचा ३० चा व इंग्रजीसाठी ४० चा वेगचे प्रमाणपत्र घेण्यात आले. मात्र, सदर टंकलेखन परीक्षेदरम्यान अधिकच्या शब्द प्रति मिनिटच्या वेगाने चाचणी घेण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये सदर चाचणीदरम्यान गोंधळ निर्माण झाला आहे.
२०१९ पर्यंत पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेऊन मुख्य परीक्षेच्या गुणांकावर अंतिम निकाल लावला जात होता. परंतु, या भरती प्रक्रियेत प्रथमच पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. यासाठी आतापर्यंत दोनदा चाचणी घेण्यात आली. मात्र, दोन्ही वेळेस उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तसेच राज्यसेवा परीक्षा ४ दिवसांवर असताना तडकाफडकी सात दिवस आधी सूचना देत परीक्षा घेण्यात आली. ज्यात उमेदवारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अपात्रतेची संभाव्यता अधिक आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेतील टंकलेखन कौशल्य चाचणी सरसकट रद्द करुन पुर्वीप्रमाणेच मुख्य परीक्षेच्या गुणांवर अंतिम निकाल जाहीर करून उमेदवारांची निवड करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात यंग चांदा ब्रिगेड चे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक करणसिंग बैस, बबलू मेश्राम यांचा समावेश होता.