वरोरा : खासगी सावकाराने कर्जाची रकम न दिल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेतीचा ताबा मिळविण्यासाठी मोजणी सुरू केली. या मोजणीला विरोध करीत पीडित शेतकऱ्याने पोलिसांच्या उपस्थितीत शेतीतच विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्याला तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी (ता. ७) तालुक्यातील वंदली शेतशिवारात घडली असून मारुती महादेव चौधरी असे विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील वंदली येथील मारुती महादेव चौधरी यांची खडक तांगडी रिठ परिसरात सुमारे पाच ते सोळा हेक्टर शेतजमीन आहे. यातील दोन हेक्टर शेतजमीन एका व्यक्तीकडे ठेवून खासगी कर्जाची उचल केली. त्यानंतर काही दिवसानंतर संबंधित व्यक्तीला कर्जाची रकम परत केली, असे चौधरी यांचे म्हणणे आहे. परंतु, संबंधित व्यक्तीने कर्जाची रकम मिळाली नसल्याने शासकीय मोजणी करून चौधरी यांची शेतजमीनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. काही दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीने शेतजमीन मोजणीचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित शेतकऱ्याने विरोध केल्याने मोजणी न करता परत जावे लागले होते.
यानंतर शेतकरी मारुती चौधरी यांनी वरोरा पोलिस ठाणे आणि भूमी अभिलेख कार्यालयात शेतजमीनीची मोजणी करू नये, मी ताबा देणार नाही, अशी तक्रार दाखल केली होती. यानंतर कर्ज देणाऱ्या व्यक्तीने ७ जून रोजी पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा शेतजमीनीची मोजणी सुरू केली. यावेळी चौधरी यांनी मोजणीला विरोध करीत शेतातच विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर शेतकऱ्याला तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत मारुती महादेव चौधरी या शेतकऱ्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.