Homeचंद्रपूरसौर कृषीपंप मिळणार अनुदानावर प्रधानमंत्री कुसूम योजना; खुला, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील...

सौर कृषीपंप मिळणार अनुदानावर प्रधानमंत्री कुसूम योजना; खुला, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ

चंद्रपूर : केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच वर्षांत राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९०, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप मंजूर करण्यात येत आहे.

शासनाने अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौरऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. कुसुम योजनेंतर्गत ३, ५ आणि ७.५ हॉर्स पॉवर क्षमतेचे सौरपंप या योजनेतून दिले जातात. ३ एच.पी. पंपाची जीएसटीसह एकूण किंमत एक लाख ९३ हजार ८०३ रुपये आहे. कुसूम योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला यासाठी ९० टक्के अनुदान वगळता १० टक्के प्रमाणे केवळ १९ हजार ३८० रुपये, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९५ टक्के अनुदान वगळता पाच टक्केप्रमाणे केवळ ९ हजार ६९० रुपये भरावे लागणार आहे.
तसेच ५ एचपी पंपासाठी एकूण २ लाख ६९ हजार ७४६ किंमतीच्या १० टक्के प्रमाणे २६ हजार ९७५ रुपये आणि पाच टक्के प्रमाणे १३ हजार ४८८ रुपये भरावे लागतील. ७.५ एचपी पंपासाठी एकूण ३ लाख ७४ हजार ४०२ रुपये किंमतीच्या १० टक्के प्रमाणे ३७ हजार ४४० रुपये आणि पाच टक्के प्रमाणे १८ हजार ७२० रुपये भरावे लागणार असून, उर्वरित रकमेचे अनुदान शासनाकडून देय राहणार आहे.

प्रथम प्राधान्य तत्वावर मिळणार लाभ
सौर कृषीपंप योजनेचा लाभ प्रथम प्राधान्य या तत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी महाऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकरण्यासाठी कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर अर्ज करावा. योजनेबाबत सर्व माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी ०२०-३५०००४५६/ ०२०-३५०००४५७ या क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधादेखील महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी उपलब्ध करून दिली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!