Homeचंद्रपूरआमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर चुकीची माहिती दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी...

आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर चुकीची माहिती दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी मागितली माफी “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा उपक्रम” चांगलाच गाजला

चंद्रपूर : ‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आज दिनांक २४ मे रोजी कन्नमवार सभागृहात आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. प्रलंबित समस्यांची समाधानकारक माहिती न दिल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आमदार सुधाकर अडबाले यांनी चांगलेच धारेवर धरले. सभेत चुकीची माहिती दिल्यानंतर आमदारांनी आक्षेप घेताच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माफीही मागितली. या माध्यमातून माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील जवळपास २५ सामूहिक व अनेक प्रलंबित असलेल्या वैयक्तिक समस्या चर्चेत आल्या. माध्यमिक विभागातील समस्यांची उत्तरे देताना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चांगलीच दमछाक झाली. अनेक समस्यांचे समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे बैठकीत वातावरण तापले. २४ मे २०२३ रोजी समस्यांवर बैठकीचे आयोजन असताना कार्यालयातील काही जबाबदार अधिकाऱ्यांना सुट्टी मंजूर केल्याबद्दलचा मुद्दाही ऐरणीवर आला. त्यात शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. प्रलंबित समस्यांचे स्पष्टीकरण देताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना चांगलाच घाम फुटला. या सभेमध्ये अधिकारी व समस्याग्रस्त कर्मचारी आमने सामने आल्यामुळे आमदारांसमोर अधिकाऱ्यांचा चांगलाच धुराडा उडाला. सभेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची समाधानकारक कुठलीही पूर्वतयारी नसल्यामुळे शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. अनेक शासकीय आकडेवारी देखील त्या सांगू शकल्या नाही. ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली. सायंकाळी साडेसहा वाजले तरी सभा सुरूच होती. या सभेमुळे प्राथमिक व माध्यमिक विभागातील समस्याग्रस्त शिक्षकांमध्ये समाधानचे वातावरण होते. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कर्मचारी व संघटनांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार व्यक्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित सामुहिक व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व याच विषयांवर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देश आमदार अडबाले यांनी शिक्षक विभागास दिले.

जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभेत माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देशमुख,
उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, जगदीश जुनघरी, शिक्षक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, समस्याग्रस्त, शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालील प्रलंबित समस्यांवर करण्यात आली चर्चा

प्राथमिक शिक्षण विभागातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती करण्याबाबत चर्चा करणे, चटोपाद्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी चालू ठेवणे व भविष्यात अतिप्रदान वसुली न करणे, सन 2022-23 प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करणे व प्राथमिक शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करणे व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शाळेत पदस्थापना देणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसरा व तिसरा हप्ता अदा करणे, सन २०२२-२०२३ चे शाळांना सादिल खर्चाबाबत माहिती, डीसीपीएस/ एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना प्राण नंबर देणे. त्यांच्या एनपीएस पावत्या वितरण सध्यस्थिती, शिक्षकांच्या GPF पावत्या वितरणाची सद्यस्थिती, शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्राथमिक विभागातून उच्च प्राथमिक विभागात निम्नश्रेणी शिक्षकांचे समायोजन झाल्यास त्यांना माध्यमिक शिक्षकांची वेतन श्रेणी मिळण्याबाबत चर्चा करणे, प्रलंबित वरिष्ठ श्रेणी/ निवड श्रेणी प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याबाबत चर्चा करणे, शैक्षणिक पात्रता वाढविण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावर देण्याबाबत चर्चा करणे, प्रलंबित वैद्यकीय देयके बाबत चर्चा चर्चा करणे. मंजूर झालेल्या वैद्यकीय देयकांची तात्काळ प्रतिपूर्ती करणे, पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी वेतन निश्चिती पडताळणीसाठी पाठविलेल्या मूळ सेवापुस्तकांची त्वरित पडताळणी करून पंचायत समितीला पाठविणे बाबत चर्चा करणे, भविष्य निर्वाह निधी परतावा / ना परतावा, अग्रीम प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करणे तर माध्यमिक विभागातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 06/02/2023 मा. शिक्षण संचालक यांचे परिपत्रक दि. 26/03/2023 व दिनांक 04/05/2023 नुसार टप्पा अनुदान वाढ (२०%, ४०%, ६०%) बाबत चर्चा करणे व त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांची २०% पात्र बाबत चर्चा करणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 20/04/2023 च्या परिपत्रकान्वये “वन हेड वन व्हाउचर” योजना चंद्रपूर जिल्ह्यात कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करणे, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चंद्रपूर यांच्याकडे प्रलंबित वैद्यकीय देयक, अर्जित रजा रोखीकरण, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी फरकाची देयके, शासन स्तरावरून मान्यता प्राप्त देयके बाबत चर्चा करणे, GPF परतावा / ना परतावा देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान देयके, मयत कर्मचाऱ्यांचे GPF इन्शुरन्स देयके बाबत चर्चा करणे, खासगी अनुदानित शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका देणे. दिनांक 24/03/2023 च्या प्रसिद्ध राजप्रत्रानुसार सेवा ज्येष्ठता योजना यादी प्रसिद्ध करण्याबाबत चर्चा करणे, सन 2022-2023 व 2023-2024 च्या संच निर्धारणाची सद्यस्थिती व त्यानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करणे, अंशत: अनुदानित शाळा / तुकडीवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबात सद्यस्थिती, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना वरिष्ठ / निवड श्रेणी लागू करण्यातबाबत चर्चा करणे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्राण नंबर देणे. जीपीएस/ एनपीएस पावत्या वितरणाची सद्यस्थिती, कार्यरत / सेवानिवृत्त ज्या कर्मचाऱ्यांचे जीपीएस/ एनपीएस खाते नाही, अशा कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सहाव्या / सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्ताबाबत चर्चा करणे व अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!