Homeचंद्रपूरपुस्तके वाचण्याच्या वयात चेहरे वाचू नका...

पुस्तके वाचण्याच्या वयात चेहरे वाचू नका…

प्रेमाचा आठवडा सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस प्रेमविरांसाठी अच्छे दिन आहेत. तसे बघता प्रेमासाठी निश्चित असा एखादा दिवस किंवा एखादा काळ नसतो. तरीही फेब्रुवारी महिन्याची प्रेमवीर आतुरतेने वाट बघत असतात. कारण फेब्रुवारी महिन्यात प्रेमविरांचे प्रेम जरा जास्तच उतू जात असते. रोज डे, प्रॉमिस डे, प्रपोज डे, किस डे, व्हॅलेन्टाईन डे असे दिवस साजरे करत असताना आमच्या प्रेमवीरांच्या आयुष्याचे घोडे कसे लागतात हे प्रेमविरांना कळत सुद्धा नाही. त्यामुळे या प्रेमामध्ये अनेक प्रेम(वीर) होत असल्याचे चित्र समाजामध्ये सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हा लेखप्रपंच.

प्रेम नावाच्या दोन अक्षराच्या शब्दाने कित्येक लोकांचे जीवन सुंदरपणे घडविले आहे. पण आजकालच्या तरुण-तरुणींना प्रेम घडवत कमी आणि बिघडवत जास्त असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. सकाळी सकाळी कोणतेही वर्तमानपत्र उघडले की, प्रेमामध्ये किंवा प्रेमासाठी एका तरी तरुण-तरुणीची हत्या किंवा आत्महत्येची बातमी हमखास आपल्याला दिसते. खरंच आयुष्य इतकं स्वस्त झाले आहे का? ज्या वयामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आयुष्य घडवायचे असते त्या वयात आमचे तरुण मित्र-मैत्रिणी एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःचे सुंदर असे आयुष्य संपवत असतील तर ही दुर्दैवाची आणि चिंताजनक बाब आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

प्रेम करू नये असे नाही. परंतु आज प्रेम करण्याची पद्धतही काळानुसार बदललेली दिसते आहे. काही दिवसापूर्वी एका व्यावसायिकाच्या घरी बसलो होतो. त्यांनी चिंता व्यक्त केली की, आम्ही दररोज रात्री आमचे दुकान बंद करून घरी परत येताना काही जोडपे आम्हाला रस्त्यावरील एखाद्या झाडा- झुडपातून बाहेर निघतांना दिसतात. झाडाझुडपात जोडपे काय करायला जात असतील हे आता वेगळे सांगायला नको आणि हल्ली आई वडिलांना सुद्धा हे विचारायला वेळ नाही की, आपला मुलगा/मुलगी रात्रीच्या वेळी कुठे जातो. मग एखाद्या वेळी असे काही प्रसंग घडतात की त्यावेळी आई- वडिलांना डोके धरून बसल्याशिवाय आणि पश्चातापाशिवाय पर्याय राहत नाही.

ती किंवा तो भेटला नाही म्हणून स्वतःला संपविणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण-तरुणींनी स्वतःचे सुंदर असे आयुष्य प्रेमासाठी बरबाद करत आहेत आणि अक्षरशः आपल्या सोबत आपल्या आई-वडिलांच्या कित्येक स्वप्नांचाही चुराळा करत आहेत आणि ही बाब आजच्या घडीला खूप भयंकर चिंताजनक आहे. त्यामुळे प्रेम करू नका असे मी अजिबात म्हणणार नाही. परंतु स्वतःला ओळखा. आपल्या स्वप्नांचा विचार करा. आपल्या आई वडिलांचा विचार करा. आपण आपला अमूल्य असा वेळ कुणासाठी देत आहोत हेही समजून घ्या. कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही आणि हातात काही नसेल तर सोबत असलेली व्यक्ती सुद्धा आपल्याला भेटत नाही हेही तितकेच खरे.

त्यामुळे प्रेमामध्ये दिशाहीन होऊन इकडे तिकडे पसरण्यापेक्षा वेळ असतानाच स्वतः सावरावणे कधीही चांगले. कारण एकेकाळी आपआपल्या क्षेत्रामध्ये नावाजलेली अनेक तरुण मंडळी या प्रेमाच्या चक्रव्युहामध्ये अशी काही अडकली की, आज सन्मानाने चारचौघात उभे सुद्धा राहत नाही. ज्यांचा समाजामध्ये कायम बोलबाला होता ते हल्ली कुठेही दिसत नाही. प्रेमामध्ये मिळालेल्या विरहात एकेकाळची हस्ती असलेल्या तरुण मंडळींनी जिंदगी सस्ती करून दारू आणि खर्रासोबत दोस्ती केली. ज्यांच्या वाणीतून कधीकाळी सुंदर असे मंत्रमुग्ध करणारे विचार बाहेर यायचे त्यांच्याच तोंडातून आज दुर्गंधी येते. त्यामुळे कोणतेही व्यसन पडवडते पण माणसांचे नको. कारण माणसाला माणसांचे लागलेले व्यसन हे जगातील कोणत्याही व्यसनापेक्षा फार खतरनाक असते.

तरुण वयामध्ये प्रेम करत असताना आपल्याला काही वाटत नसते. कारण सुख, समाधान, आनंद, मोह यामध्ये आपण बरेच खुश असतो पण पुढे जसे वय वाढत जाते तशी करिअरची चिंता वाटायला लागते आणि ज्यावेळी हातामध्ये काहीच राहत नाही तेव्हा मग आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. पण तेव्हा आपल्या हातातून वेळ गेलेली असते. आपली वाट चुकलेली असते. काय करावे कळत नाही. यामुळे ताणतणाव वाढतो. तणावातून नको ते विचार मनामध्ये येतात आणि बरबादीकडे आपले एक पाऊल आपण टाकतो. त्यामुळे तरुण वयामध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडण्यापेक्षा आणि कुणाचे तरी चेहरे वाचत बसण्यापेक्षा पुस्तके आणि समाज वाचणे कधीही चांगले. कारण यातून किमान चांगला माणूस तर घडेल…

-सुरज पी दहागावकर
चंद्रपूर
मो नं ८६९८६१५८४८

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!