बळीराम काळे/जिवती
जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह यासह अनेक गावांत पावसाचा फटका बसला. जिवती शहरातील रस्त्यावरील दुकानदार, व्यापारी, तालुक्याच्या ठिकाणी विविध कामाकरिता आलेले नागरिक तसेच शेतीच्या मशागतीला गुंतलेला शेतकरी यांची एकच तारांबळ उडाली व विजासह पडलेल्या अवकाळी पावसाने काही काळ नागरिक भयभीत झाले होते.
अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात माराई पाटण, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा इत्यादी व अनेक गावातील नागरिकांच्या घरावरील टिन उडाली व घरातील संसारउपयोगी साहित्यासह अन्न धान्याची नासाडी झाली. यात अनेकांचे नुकसान झाले आहे. तसेच पालडोह येथील हनुमान मंदिरावर वीज पडून मंदिराचा काही भाग पडला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. झालेल्या नुकसानीचे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.