Homeसामाजिक वंदन लोकराजाला... छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीला आज १०० वर्ष पूर्ण होत...

वंदन लोकराजाला… छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीला आज १०० वर्ष पूर्ण होत आहेत… शाहू महाराज यांचे जीवनकार्य आणि योगदान-सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक-इंडिया दस्तक न्यूज टीव्ही)

बालपण: घाटगे घराणे मूळचे राजपूत आणि राजपुताण्यातील राठोड या कुळातले होते. हेच राठोड सूर्यवंशी होते. यावनी आक्रमणामुळे जी राजपूत घराणे दक्षिणेकडे स्थलांतरित झाली त्यात घाटगे घराण्याचा सुद्धा समावेश होता. या कुळातील कामराज सूर्यवंशी यांनी चौदाव्या शतकात आपल्या पराक्रमाने,कर्तुत्वाने बिदरच्या सुल्तानाकडून सरदारपद मिळविले. पण कामराज घाटगे या नावानेच…या सूर्यवंशी पासून घाटगे नाव कसे झाले ह्याचा इतिहास सुद्धा खूप सुंदर आहे. या कामराज सूर्यवंशी सरदाराने एकदा खूप उंचीवर टांगलेली घंटा वरच्यावर उड्या मारून दोनदा वाजविली त्यामुळे घाट वाजविणारे घाटगे असे नामांतर झाले. दुसरी एक गोष्ट म्हणजे एकदा ह्या घराण्यांचे पूर्वज लखमोजी आणि रामोजी हे रसद घेऊन बिदरला जात असतांना त्यांना एका घाटात शत्रूंनी अडविले पण आपल्या पराक्रमाने त्यांनी शत्रूचा पराभव करून तो घाट आपल्या ताब्यात घेतला म्हणूनच घाट घेणारे घाटगे असे नाव पडले…घाटगे हे कागलचे जहागिरदार होते. १८१५ मध्ये कागगचे अधिपती हिंदुरावबाबा शिंदे दरबारी गेले होते आणि नंतर परत आलेच नाही. त्यामुळे १८१५ ते १८७८ ह्या त्रेसष्ट वर्षाच्या काळात कागल जहागीर कारभारावर नोकरशाहीचा वरचष्मा राहिला होता. या काळात प्रजा त्रासून गेली, सर्वत्र अशांतता पसरलेली होती, खजिना रिक्त झाला होता आणि एवढेच नाही तर जहागिरला न झेपावणारे कर्ज झाले होते. अश्या वेळी करवीर दरबाराने कागल जहागीर आपल्या ताब्यात घेतली. अश्या बिकट परिस्थितीत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे(शाहू महाराज यांचे वडील) यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला. जयसिंगराव यांचा जन्म करवीरचे छत्रपती बाबासाहेबमहाराज यांच्या भगिनी बाळाबाई आणि नारायणराव घाटगे यांच्या पोटी ०१ मार्च १८५६ रोजी झाला..घाटगे घरच्यांना इतिहास अभिमानास्पद असून तो सुवर्णअक्षरांनी लिहला गेला आहे…..
कुशाग्र बुद्धीच्या आपल्या भाच्यांचे शिक्षण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून बाबासाहेब महाराजांनी एल्फिन्स्टन कॉलेजचे फेलो यशवंत आठले यांना जयसिंगरावाचे ट्यूटर म्हणून नेमणूक केली. १८७७ मध्ये कृष्णजी गोखले यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली. गोखले यांनी जयसिंगराव यांना वाचनाचा छंद लावला..जयसिंगराव लहानपणापासूनच धिप्पाड शरीराने कुस्ती आणि धाडसाने शिकार करण्यात तरबेज झाले. कागल जहागिरीत चोऱ्यामाऱ्याचे आणि दरोडेखोरीचे प्रमाण खुप वाढेल होते. रयतेचा कुणी त्राता उरलेला नव्हता. जहागीर कर्जात बुडाली होती. अश्या बिकट,भयानक परिस्थितीमध्ये जयसिंगराव यांच्याकडे १८७८ मध्ये कारभाराची सूत्रे हाती आली. कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या राज्यातील लोकांची स्थिती, आर्थिक स्थिती आणि राज्यकारभाराची रीती नीट करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यकारभारात समाजपयोगी कामे करण्यास सुरुवात केली. जयसिंगरावांने आपल्या कारकिर्दीत मोठ्या तडफतेने,कुशाग्र बुद्धीने आणि काटकसरीने कारभार केला त्यामुळे वरीष्ठांच्या वर्तुळात त्यांचा समर्थ प्रशासक म्हणून नावलौकिक झाला होता….पण २० मार्च १८८६ रोजी जयसिंगराव यांच्यावर काळाने घात केला. त्यांचे अवघ्या तीस वर्षात निधन झाले. मुत्युच्या वेळी असि. पो. वुईल्यम ली वॉर्नर हे जयसिंगराव यांच्याजवळ होते.त्यांच्याजवळचे जयसिंगराव यांनी अखेरची इच्छा व्यक्त केली. हेच जयसिंगरावचे अलिखित मृत्युपत्र होय. या तोंडी मृत्युपत्रात जयसिंगराव म्हणतात की, “जोपर्यत आपल्या मुलांना इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान आणि सराव होत नाही तोपर्यत त्यांना इंग्लंडला पाठवू नये…जयसिंगराव यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान होते..ते इंग्रजीमध्ये बोलू शकतात असा अभिप्राय संस्थानचे कारभारी रावबहादूर महादेव वासुदेव बर्वे यांनी नमूद केलं आहे…त्याचप्रमाणे मुलांचे विवाह अठरा वर्षे झाल्यावरच करावीत..अशी इच्छा सुद्धा त्यांनी मृत्युपत्रात व्यक्त केली होती. जयसिंगराव घाटगे उर्फ आबासाहेब यांचा विवाह लवकरच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी मुधोळच्या एकुलत्या एक राजकन्या राधाबाईसाहेब यांच्याशी इ.स.१८६४ मध्ये झाला…जयसिंगराव आणि राधाबाईसाहेब यांना २६ जून १८७४ रोजी पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव यशवंतराव ठेवण्यात आले..
१८१८ मध्ये पेशवाईचा अंत झाला. त्यानंतर पुढे कोल्हापूरच्या गादीवर अनेक संकटे आली. कारण त्या काळात राज्यसत्तेवर येणारे छत्रपती हे वयाने लहान असल्याने योग्य राज्यकारभार करणे कठीण जात होते त्यामुळे ब्रिटिश सरकारने नेमलेल्या ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या कारस्थानांना उत आला होता. या काळात छत्रपती शिवाजी तिसरे उर्फ बाबासाहेबमहाराज हे कारभार करत होते पण दुर्दैवाने १८६६ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गादीवर आलेल्या राजाराम महाराजांची राजकीर्द अवघ्या चार वर्षात संपली. कारण विलायतेवरून परत येतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या गादीवर बसण्यासाठी दत्तक पुत्राची शोधमोहीम सुरु झाली. अखेर नारायणराव दिनकरराव भोसले सावर्डेकर या अवघ्या साडेआठ वर्षाच्या मुलाला दत्तक घेऊन २३ ऑक्टोबर १८७१ साली सकवारबाई राणीसाहेबांच्या मांडीवर बसून चौथे शिवाजी या नावाने कोल्हापूरचा राज्यकारभार करू लागले.
चौथ्या शिवाजी महाराजांची कारकीर्द मात्र अत्यंत वाईट ठरली. १८७५ मध्ये चौथ्या शिवाजी महाराजांची मनस्थिती ठीक नसल्याचे डॉ.मर्फी यांनी एका अहवालानुसार सांगितले. आणि अश्या चिंताग्रस्त वातावरणात चौथ्या शिवाजी महाराजांचा मृत्यू २५ डिसेंबर १८८३ मध्ये झाला. चौथ्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या राजघराण्यात चार विधवा राण्या झाल्या होत्या. शहाजी उर्फ बुवासाहेब यांच्या पत्नी ताईसाहेब, तिसऱ्या शिवाजीच्या पत्नी अहिल्याबाई,राजाराम महाराजांच्या पत्नी सकवारबाई आणि दुर्दैवी चौथ्या शिवाजीच्या पत्नी आनंदाबाई. चौथे शिवाजी महाराज गेल्याने पुन्हा दत्तक घ्यावा लागेल असे त्यावेळीचे कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट कर्नल रिव्हज यांनी मुंबई गव्हर्नरला कळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्नल रिव्हज यांनी राजवाड्यातील चारही राण्यांसोबत बोलणे केले. पहिला दत्तक घेतलेला मुलगा वेडा निघाल्यास दुसरा मुलगा दत्तक घेण्याचे अधिकार राणीसाहेबांना होते. त्यामुळे चारही राण्यांना असे वाटत होते की, आपण बाहेरून दत्तक न घेता जयसिंगराव उर्फ आबासाहेब यांच्या दोन मुलांपैकी एकाला दत्तक घ्यावे.
जयसिंगराव एका मुलाला दत्तक देण्यास तयार झाले. त्यावेळी या तपशिलावर सविस्तर पत्र कर्नल रिव्हज ने मुंबईला लिहले. ह्यात आबासाहेब उर्फ जयसिंगराव यांच्या संमतीबद्दल लिहतात की, *”सरकार जर थोरल्या मुलाला दत्तक घेत असेल तर ते उचित होईल.”* थोरला मुलगा दत्तक म्हणून घेणे उचित का आहे याची दोन कारणे म्हणजे, पहिले कारण असे की,लहान मुलाला म्हणजे पिरोजीराव उर्फ बापूसाहेब यांना दत्तक घेतले तर ते पुढे छत्रपती बनतील आणि जहागीरदार म्हणून मोठ्या मुलाला म्हणजेच यशवंतराव यांना पिरोजीराव यांच्या हुकूमशाहित राहावे लागले असते. दुसरे म्हणजे राजा म्हणून कोणता मुलगा यशस्वी होईल याची शिफारस स्वतः त्यांच्या पित्याने केली असल्याने ती नाकारण्याचे धाडस कुणी करू शकत नव्हते..तसेच मोठा मुलगा वयानेही थोडा मोठा असल्याने यशवंतराव (शाहू महाराज) यांना कोल्हापूर संस्थांनात दत्तक म्हणून घेतल्या गेले. १७ मार्च १८८४ रोजी दत्तकाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाहू महाराज हे अवघ्या दहा वर्षाचे होते. पुढे सनातनी ब्राह्मणांनी त्यांना राज्यकारभारात त्रास दिला. घाटग्याच्या घरी जन्म घेतलेले आणि पुढे भोसल्याच्या घरी दत्तक गेल्याने शाहू महाराजांना दोन्ही कुळातील लोकांचे हक्क दीर्घकाळ झगडुन प्रस्थापित करावे लागले…

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक योगदान…”

राजर्षी शाहू महाराज या नावाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते म्हणून जगप्रसिद्ध होते. आपल्या संस्थानातील शोषित,पीडित समाज सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा या हेतूने नाविन्यपूर्ण योजना,कायदे आणि हुकूम शाहू महाराज नेहमी काढत असायचे. शाहू महाराजांनी माणसातला राजा अन् राजामधील माणूस बनून समाज परिवर्तनाचा वसा आपल्या खांद्यावर घेतला आणि सामाजिक सुधारणा आपल्या राज्यकिर्दीत घडवून आणली. बेरड समाजाच्या घरी जेवण करणे असो की फासेपारध्यांना माणसात आणण्याचा प्रसंग असो शाहू महाराजांनी प्रत्येक वेळी वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला…..
शाहू महाराजांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यात महाराज म्हणतात की *”आमची सर्व प्रजा सतत सुखी राहावी, प्रजेचे कल्याण होत राहावे, आमच्या संस्थानाच्या प्रत्येकांची भरभराट व्हावी अशी आमची इच्छा आहे.”* या पहिल्याच जाहीरनाम्यात महाराजांनी जी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा त्यांनी आपला राज्यकारभार लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घालून सत्यात उतरवली. एक राजा म्हणून लोकांच्या हृदयात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले…
शाहू महाराजांच्या विचारांच्या कार्याचे प्रतिबिंब आजच्या समाजात उमटले नसते तर काय झाले असते यांचे वर्णन करतांना वीर उत्तमराव मोहिते म्हणतात की, *”कोल्हापूरचे शाहू महाराज जन्माला आले नसते तर आजचे मराठा पुढारी कोठे असते कोण जाणे ! हे पुढारी बांबूची लांब काठी हातात घेऊन माळरानावर हर sss मेंढी करीत शेळ्या-मेंढ्याच्या कळपामागे धावताना दिसले असते. महाराष्ट्रातला मराठा-दलित आणि आफ्रिकेतील निग्रो यात फरक दिसला नसता. भारतातील दलित अस्पृश्य समाजाची स्थिती गोठ्यातील गुरा-ढोरांपेक्षा वेगळी दिसली नसती. भारतीय राज्यघटना निर्मितीचा मान डॉ. आंबेडकरांना न मिळता तो पुरीच्या शंकराचार्याला मिळाला असता…!”*
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील सर्व परिस्थिती समजून त्यावर उपाययोजना केल्या. सुरुवातीला सर्व जातीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून प्रत्येक जातीच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सोबतच वसतिगृह काढले. महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्यादृष्टीने पाउले टाकायला सुरवात केली. त्यांनी सर्वप्रथम बहुजन समाजातील घटकांना साक्षर करण्याचे पाऊल उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला.
मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती. ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली आणि २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय जातींना ५० % जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.
जातीव्यवस्था ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती. त्यामुळे संस्थानातील जातिव्यवस्था मोडण्यासाठी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका बहुजन समाजातील व्यक्तीला हॉटेलचा शेड उभारून व्यवसाय निर्माण करून दिला. फक्त व्यवसाय उभारून दिला नाही तर दररोज त्यांच्या हॉटेल मध्ये स्वतः जाऊन चहा प्यायचे. एवढयातच न थांबता आपल्या संस्थानातील प्रत्येक अधिकारी,कर्मचारी आणि प्रत्येक नागरिकांस त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला लावायचे. यावरून हे स्पष्ट होते की, शाहू महाराज वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या खालच्या दर्जाच्या लोकांच्या उन्नतीसाठी किती प्रयत्नशील होते….
शाहू महाराजांनी बहुजन समाजातील लोकांना पैलवानी कलेत उतरविण्यासाठी “जाठ पैलवान” हि उपाधी देऊन त्यांना प्रोत्साहित केले. चांभारांना ‘सरदार’ आणि भंग्याना ‘पंडित हि उपाधी दिली. सोबत महार जातीच्या लोकांना कमरेला तलवारी लटकावून “शिलेदारी” करण्याची परवानगी दिली. मागासवर्गीस कधीच पुढे येणार नाहीत हे जाणून अस्पृश्यपैकी लक्ष्मण मास्तर आणि गणपत पवार यांना शिवणयंत्र खरेदी करून दिलीत. त्यांच्याकडे कपडे शिवायला कोण टाकणार म्हणून स्वतःच आपले राजवस्त्रे त्यांच्याकडे शिवायला टाकली….
कोल्हापूर संस्थानात प्लेग आणि दुष्काळात गरीब जनता बेघर होऊन रस्त्यावर आली. तेव्हा त्याच्यासमोर प्रश्न पडला निवाऱ्याचा आणि खाण्यापिण्याचा. त्यामुळे शाहू महाराजांनी अश्या गरीब लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. कटकोल, पन्हाळा, बाजारभोगाव, गारगोठी, तिरवडा, बांबवडा आणि कोल्हापूर या ठिकाणी गरीब लोकांना राहण्यासाठी आश्रम काढून दिले. औषधे,गोळ्या पुरवून गरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महाराजांनी मिटवला. त्यांना मायेची ऊब देऊन कपडे लावायला दिले. तसेच अश्या लोकांना खायला धान्य सुद्धा दिले……
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लोकांची गरिबी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अज्ञान, श्रीमंताकडून गरीब लोकांची होणारी पिळवणूक, खराब रस्त्याची दुर्दशा जुळवून बघितली होती….हे सर्व बघून शाहू महाराज अस्वस्थ झाले. आपल्या राज्यात सुधारणा झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली. दुष्काळांच्या काळात एका जागेवरून जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी रस्त्याची कमतरता होती. रस्ते खराब झालेली होती, तर कुठे तर रस्तेच नसायचे. त्यामुळे शाहू महाराजांनी पक्के रस्ते बांधकाम काम सुरू केले.
शाहू महाराजांनी समाजाने नाकारलेल्या फासेपारधी जमातीचे लोक सामान्य माणसाच्या वस्तीत राहावे म्हणून त्यांना राहण्यासाठी जमिनी दान केल्या. समाजाच्या नजरेत गुन्हेगार जमात म्हणून ओळख असलेल्या,जंगलात राहणाऱ्या मानव जातीला आपल्या समाजाच्या चौकटीत आणले अन् नुसते आणलेच नाही तर त्यांना आईची माया देऊन त्यांचे जीवनमान उंचविले जाऊ शकते ह्यावर महाराजांनी अंमल केला. कुणी विचार करू शकणार नाही असे परिवर्तन शाहू महाराजांनी आपल्या राजकीर्दीत करून दाखवले. अश्या सामाजिक परिवर्तनाच्या जादुगरास मानाचा सलाम….

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऋणानुबंध...”

मानवी जीवनाच्या आधुनिकीकरणामध्ये वाफेच्या इंजिनचा जेम्स वॅटने लावलेला शोध जसा क्रांतिकारक ठरला, तसाच शाहू छत्रपतींनी डॉ.बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा लावलेला शोध भारताच्या सामाजिक जीवनाला क्रांती देणारा ठरला. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांना शाहू महाराजांनी पुढे नेऊन चालना दिली त्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांना कायद्यात रूपांतर केले असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंध येण्याअगोदरच शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी कार्य करीत होते. शिवाजी महाराजांचा गौरवशाही इतिहास छत्रपती शाहू महाराजांना लाभला असल्याने आपली छोट्याश्या राज्यात त्यांनी अनेक सुधारणावादी कार्य करून वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना मातीत गाळले. शाहू महाराजांना आपल्या दीन-दुबळ्या, शोषित,पीडित समाजाच्या उन्नतीसाठी नेतृत्व करण्याच्या पुढाऱ्यांचा शोध घ्यायचा होता. कारण त्याकाळी प्रत्येक जातीचा पुढारी हा उच्चवर्णीयच असायचा..त्यामुळे उच्चवर्णीयांना सोडले तर बाकी जातीच्या लोकांची स्थिती हि जनावरांसारखी वाईट होती. पुढारी कसा असावा या बद्दल मत व्यक्त करतांना ६ सप्टेंबर १९१९ ला शिवतरकर मास्तरांना लिहलेल्या पत्रात शाहू महाराज म्हणतात की,
“आपण पुढारी असा म्हणून कोणास घेऊ नये, कारण पुढारी म्हणून घेतले तर तो आपली अंमलबजावणी करून घेनार आणि माझे न ऐकलं तर तुमचे संस्थेशी माझा संबंध राहणार नाही असे म्हणणार म्हणून आपण सल्लागार म्हणून नियुक्त करावे. पशुदेखील आपल्या जातीच्या पुढारी शिवाय दुसरा पुढारी स्वीकारत नाही मग मनुष्य जातीने का स्वीकारावा..? हरणाच्या कळपात कधी डुक्कर पुढारी नसते, किंवा डुक्करच्या कळपात हरणे पुढारी नसते..कबुतरांच्या कळपात बदके पुढारी नसतात अन् बदकाच्या कळपात कबुतरे पुढारी नसतात…मग मनुष्य जातीच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत…?
पुढारीपणा घेतले तर पशु-प्राण्यांसारखी दशा होते. गायी-म्हैशीचा पुढारी हा गवळी असतो, तो लहान वासरांना/रेडकांना उपाशी ठेऊन दूध विकतो आणि चैन करतो…अशीच अवस्था आपल्या क्षत्रिय,वैश्य आणि सोमवंशिय लोकांची झालेली आहे,आपण आपल्या जातीचा पुढारी न ठेवता आपण ब्राह्मणांना पुढारीपद दिले त्यामुळे ते आमच्या जातीच्या लोकांना बैलासारखे गाडीला जोडून आम्हाला बडवितात. मोडका-तोडका आपल्याच जातीचा पुढारी असला तर ते उत्तमच पण ब्राह्मणास जर आमच्या जातीचा पुढारी बनविला तर ब्राह्मणाने रोटी-बेटी व्यवहार करायला पाहिजे तेव्हाच आपण त्यांना आमचे पुढारी मानू.
शाहू महाराजांची दीन-दुबळ्या समाजाबद्दल असलेली तळमळ वरील पत्रातून दिसून येते. हजारो वर्षे गुलामीच्या बंधनात असलेल्या समाजावर होणारा अन्याय-अत्याचार शाहू महाराजांनी बघितला होता. राजा असूनही वेदोक्ताचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मागासवर्गीय समाज आपल्या समाजव्यवस्थेत आला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी आपल्यातीलच एका पुढाऱ्याचा शोध घेत होते.. महाराजांचा हा शोध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने संपला. देशाच्या एकुणच जडणघडणीवर नजर टाकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला टाळून पूढे जाणे अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजाला मिळालेले एक नक्षत्रांचे देणे आहे. जगभ्रमंती, वाचन आणि व्यासंग यांचा प्रचंड मोठा आवाका, समाजव्यवस्थेची पक्की जाण आणि त्यातील बदलांचे पक्के आणि निर्णायक उपाय या सर्वांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आज केवळ भारत नव्हे तर, जगभरात या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञानभांडाराचा आधार घेतला जातो. पण, कोणताही महामानव एका रात्रीत जन्माला येत नाही. त्याच्या कार्याला पाठींबा देणारे अनेक हात त्याच्यासोबत असावे लागतात. असे हात जेव्हा असा मानवास मिळतात तेव्हा, समाजात अद्भूत परिवर्तन घडते जे पूढच्या समाजाचे भविष्य असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेटही समाजाचे भविष्य ठरवणारीच. भीमराव आंबेडकर नामक व्यक्तीने उच्च पदवी प्राप्त केली हि बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेव्हा त्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या परळ येथील चाळीत आपला प्रतिनीधी पाठवून आंबेडकरांना कोल्हापूरला यायचे निमंत्रण दिले.
दरम्यान, महाराजांचे निमंत्रण स्विकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला आले. तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली. याच भव्य कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूरी मानाचा “जरीपटका” बांधण्यात आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेट समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि समाजकार्याची व्याप्ती वाढवणारी ठरली. या भेटीने दोघांच्या मनात विशेष जिव्हाळा निर्माण झाला. दोघांच्या जीवनाचे उद्दीष्ट एकच होते, ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विकास.
१९२० मध्ये कोल्हापूरातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. विशेष म्हणजे या अधिवेशनाला प्रामुख्याने शाहू महाराज उपस्थित होते. माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणतात की, *”तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिनंदन माझी खात्री आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील..!”*
शाहूमहाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचा मार्ग सुकर झाला. तसेच, या दोन्ही महामानवातील ऋणानुबंध जास्त घट्ट होत गेला. पूढे डॉ. आंबेडकर संपूर्ण हिंदूस्थानचे नेते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, आज दिसणाऱ्या बहुजन कुळांचा उद्धार सोडाच पण, त्यांच्या आयुष्यातील अंधार अधिकच गडद झाला असता. ज्या वेळी बाबासाहेब सामाजिक चळवळीत जास्त सक्रिय नव्हते त्यावेळी शाहू महाराजांनी बाबासाहेब यांच्यातील सक्षम नेतृत्वाचा अचूक वेध घेऊन भारतीय संविधानाचा शिल्पकार या भारत देशाला दिला होता.
या परिषदेच्या अध्यक्ष पदावरून शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, *”शाहू महाराजांनी जयंती सणासारखी धुमधडाक्यात साजरी करा..!”* हि असते सामाजिक कार्याची पावती. दोन्ही महापुरुषांनी एकमेकांच्या कार्याची दखल घेतली. दोघेही सामाजिक सुधारणेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते.विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या अकाली निधनानंतर सामाजिक सुधारणेची चळवळ डॉ.बाबासाहेबांनी जिवंत ठेवली.
पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची चिरमैत्री जमली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांना अस्पृश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले. ’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना सांगितले की “आपण ३१ जानेवारी १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,”

*_”काय करू आता धरुनिया_*
*_भीडा नि:शंक हे तोंड वाजविले_*
*_नव्हे जगी कोणी मुकियांचा_*
*_जाण, सार्थक लाजुन नव्हे हित..!”_*

संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले ” व्वा ! व्वा ! छान ! छान !!” असे सहजच म्हणून गेले. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे वृत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगितले. त्या काळी वृत्तपत्रांना फारश्या जाहीराती मिळत नसत. वर्गणीदारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असे तसेच वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसायचे. महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची मदत केली. या मदतीनंतर “मुकनायक” बोलु लागला. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यावेळी सोने १३ रुपये तोळे होते. यावरुन २५००/- रुपये किती मोठी रक्कम होती याची कल्पना येईल….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लडमध्ये शिक्षण घेत असतांना काटकसर करून सुद्धा पैसे कमी पडू लागले…तेव्हा ४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात, “आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना किती आदर होता हे यावरून दिसून येते. डॉ.बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली…”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती. त्या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी प्रशंसा करताना शाहू महाराज म्हणाले होते की, “तुमचे अध्यक्षस्थान स्वीकारणे आणि तुमच्यासमोर भाषण करणे हा मान खरोखरीच आंबेडकरांचा आहे. ते माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. यावेळी ते इंग्लंडमध्ये असल्यामुळे दुर्दैवाने ते या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. पण ते कोठेही असोत, अस्पृश्य वर्गाला जे दुःख होत आहे त्याची जाणीव त्यांच्या हृदयात सतत टोचत असते याची मला खात्री आहे…”
छत्रपती शाहू महाराज अस्पृश्यता निवारणासाठी किती चिंतेत होते याचे उत्तर शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लिहलेल्या पत्रात मिळते…शाहू महाराज लिहतात, “आजकाल अस्पृश्य लोकांचा विश्वास नाहीसा झालेला दिसतो आहे. आणि त्यातल्या त्यात विशेषतः महार लोकांचा जास्त प्रमाणात विश्वास नाहीसा झाला आहे…आपण मनुष्य आहो की पशुहीन नीच आहोत याची साधी कल्पना सुद्धा या लोकांना नाही. महार लोकांना स्वतःबद्दल आदराचा स्पर्श देखील नाही. मग त्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर आणणार कसा? मला वाटते की याचे कारण असे की या लोकांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी विद्यादान करणारा कुणीही नाही. तसेच विद्यादान देण्यास कुणी तयार झाला तरी सुद्धा विद्यादान घेण्यास महार लोकांना मान्य नाही. शिरोळला मुक्कामी असतांना मी महार लोकांना बंगल्यावर बोलावून माझ्या मोटारीतून फिरायला घेऊन गेलो..पण त्यांना याचे काही नवल वाटले नाही. उलट तेच म्हणाले की, “नको नको महाराज आम्हाला जवळ बोलावू नका. महार,अस्पृश्य लोकांच्या मनात हि असली भीती कुणी निर्माण केली असेल तर तेव्हाच्या ब्राह्मणी व्यवस्थेनी…त्याकाळी असलेले जुलमी कायदे अस्पृश्य लोकांना गुलाम करून ठेवणारे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांच्या कार्याचे पुरेपूर महत्व कळले होते. म्हणूनच शाहू महाराजांचे कार्य शब्दबद्ध करावे यासाठी “मूकनायक” चा विशेषांक काढण्याची योजना बाबासाहेबांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांना पत्र लिहून म्हणतात की, माणगाव आणि नागपूर च्या परिषदेत पास झालेल्या ठरावाला लक्षात घेऊन *”२६ जून”* या दिवशी हुजुरांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच आपल्या मदतीमुळे चालत असलेल्या मूकनायक चा स्पेशल अंक आपल्या नावाने काढण्याचे ठरविले आहे. तुमच्या कार्याची दखल घेऊन मुकनायकच्या “शाहू स्पेशल अंकात” आपल्या कारकिर्दीतील झालेल्या परिवर्तनवादी कार्याची माहिती शब्दबद्ध करायची आहे. तसेच हुजुर (शाहू महाराज) तुमचा एक फोटो अंकासोबत छापायला पाहिजे. तुमच्या वाढदिवसाला अगदी कमी दिवस बाकी असल्यामुळे मी आजच सायंकाळी कोल्हापूरला येण्याकरिता निघत आहे. मी स्वतः येऊन आवश्यक असलेली संपूर्ण माहिती गोळा करेल. हुजुरांच्या दर्शनाचा लाभ होईलच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ५ जुलै १९२० ला उच्चशिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्लडमध्ये असतांना भारतात शाहू महाराजांचे दलितोद्धारक कार्य मोठ्या प्रमाणात सुरु होते. तसेच दोन्ही महापुरुषांचा पत्रव्यवहार सुरु होता. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील नाते घट्ट होत असतांनाच ६ मे १९२२ ला शाहू महाराजांचे अकाली निधन झाले आणि या दोन्ही महामानवातील मैत्रीच्या संबंधाला विराम आला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांना बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोल्हापूर नगरीत बिंदू चौकात उभा करण्यात आला. एवढे प्रेम शाहू नगरीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केले. एका महामानवाचा अंत झाला आणि दुसऱ्या महामानवाच्या रूपाने शोषित,पीडित अश्या बहुजन समाजाचे नेतृत्व उभे झाले

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन…!”

राजश्री शाहू महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन करतांना चिकित्सक आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. *”राजांमधील माणूस अन् माणसातील राजा”* असा शाहू महाराजांचा गुणगौरव करण्यात येतो. अश्या लोकाराजाचा शैक्षणिक दृष्टीकोन कसा होता हे समजून घेणे आवश्यक आहे. शाहू महाराजांनी १९१७ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केल्यामुळे या कायद्याला तत्कालीन उच्चवर्णीयांनी प्रखर विरोध केला. विरोध करत असतांना त्यांनी म्हटले की सध्या ज्या शिक्षणव्यवस्था आहे त्यात सुखसोई करणे आवश्यक आहे….”
केसरी” मध्ये तर *”सध्याची शाळागृहे सर्वप्रथम विस्तृत आणि हवेशीर केली पाहिजे,त्यावर अधिक खर्च करण्याची गरज आहे..”* असे प्रतिपादन करण्यात आले…यामागे एकमेव उद्देश म्हणजे शिक्षणात असलेली उच्चवर्णीयांची मक्तेदारी संपृष्ठात येणार होती त्यामुळे या उच्चवर्णीय लोकांनी अश्याप्रकारे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा विरोध करण्यास सुरुवात केली. आज स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्यानंतरही गुणवत्ता घसरत आहे असे कारण समोर करून ग्रामीण भागातील शिक्षण प्रसाराला विरोध करणारे काही कमी नाहीत. बहुजन समाजातील मुले शिकून मोठ्या पदावर गेली तर आमच्या म्हशी कोण हाकणार असे प्रश्न करणारे महाशय लोकही आपल्या समोर दिसतात.
शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्या मानाने ब्राह्मण समाजाकडे त्यांनी लक्ष्य दिले नाही. त्यामुळे शाहू महाराज हे विषमतावादी आणि जातीवादी होते असा आरोप करण्यात आला होता. पण त्याकाळी ब्राह्मण समाज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुढे गेला होता. जर अश्यावेळी सर्वाना समान वागणूक दिली असती तर नक्कीच समाजात विषमता निर्माण झाली असती. कारण अगोदरच पुढे गेलेला समाज अजून पुढे गेला असता आणि मागे असेलेला बहुजन समाज कितीतरी पटीने मागेच पडला असता. त्यामुळे मागे पडणाऱ्या समाजाला पुढे नेतांना आधीच पुढे गेलेल्या समाजाला कसल्याही प्रकारचा धोका नव्हताच..त्यामुळे शाहू महाराजांनी संधीची समानता ऐवजी *”पुरेशी संधी”* हे तत्व स्वीकारले…. *”ज्यांना संधीची जास्त गरज आहे त्यांना जास्त संधी आणि ज्यांना कमी गरज आहे त्यांना कमी संधी”* म्हणजेच पुरेश्या संधीचे तत्व होय..”
शाहू महाराजांच्या काळात ब्राह्मणेत्तर मुले शिकली नसती तर ती काही उपाशी मरणार होती अशातला भाग नव्हता पण हे निश्चित आहे की जर ब्राह्मण समाजातील मुले शिकली नसती तर ती उपाशी मरणारच होती. त्यामुळे ब्राह्मण समाजातील प्रत्येक जण कोणतीही परिस्थिती असली तरीही शिक्षण घेत आणि नोकरी पटकावीत… पण ब्राह्मणेत्तर समाज शेती आणि अन्य व्यवसायावर कसे तरी स्वतःच्या गरजा पूर्ण करत असल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजाला शिक्षणाची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नव्हती. अश्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणेत्तर समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून तसेच मागे पडलेला समाज वेगाने पुढे जावा म्हणून शाहू महाराजांनी अथोनात प्रयत्न केले..शाहू महाराजांनी गोरगरीब,शेतकरी समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळात प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मण समाजाची मक्तेदारी होती. हि सर्व मक्तेदारी त्यांनी इंग्रजी शिक्षणाच्या भरवश्यावर मिळवली होती.
आपल्या भारत देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजाच्या गुलामीतून देश स्वतंत्र झाला. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारताचे सुंदर असे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ला तयार झाले आणि २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. भारतीय संविधानातील कलम ४५ आणि कलम २१ (अ) नुसार देशातील १४ वर्षाच्या आतील सर्व जातीधर्माच्या मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळायलाच पाहिजे असा कायदा लागू करण्यात आला पण आज देशात संविधान लागू होऊन सत्तर वर्ष होत असतांनाही भारतात शिक्षणाची दशा आणि दिशा काय आहे हे वेगळं सांगायला नकोच.
आज जे शिक्षणाविषयी विदारक चित्र डोळ्यासमोर दिसत आहे त्याला कारणीभूत इथले राजकर्ते आहेत. कारण सत्तर वर्ष पूर्ण होत चालली तर शिक्षनाचे प्रमाण किती आहे…? काही वर्षात भारत निरक्षरांचा देश म्हणून ओळखला जाईल असे भयानक चित्र निर्माण झाले आहे. आज जे चित्र आपणासमोर आहे तेच चित्र शाहू महाराजांच्या काळात सुद्धा होते. पण प्राथमिक शिक्षणाची गरज ओळखून शाहू महाराजांनी १९१७ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून सर्वांसाठी शिक्षणाची दारे ओपन करून दिली…
विशेषतः शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर जास्त भर दिला. शाहू महाराज एका भाषणात म्हणतात की, *”शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झालेली नाही, तसेच अज्ञानाच्या प्रवाहात बुडालेल्या देशात लढवय्ये आणि मुत्सद्दी कधीच तयार होणारच नाही म्हणूनच हिंदुस्थानाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गरज आहे…!”* शाहू महाराजांच्या काळात विशिष्ट समाजाने शिक्षण घेण्याच्या अधिकारावर मक्तेदारी मिळविली होती. इथल्या बहुजन असलेल्या वर्गाला शिक्षणाची दारे कायमची बंद करण्यात आली होती. तसेच उच्चवर्णीय लोकांनी स्वतःचे धर्मग्रंथ आणि वेद वाचायला सुद्धा बहुजन समाजावर बंदी घातली होती…
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करतांना शाहू महाराजांनी पालकांसाठीही एक कायदा केला.. जर आपला मुलगा शाळेत हजर राहिला नाही तर दरमहा एक रुपया दंड म्हणून पालकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी “आय.सी.एस” हि परीक्षा इंग्लडमध्ये होत होती.तेव्हा १९२० मध्ये भारतातील काही ब्राह्मण पुढारी ती परीक्षा भारतात व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. ब्राह्मण पुढाऱ्यांचा प्रयत्न बघून शाहू महाराज म्हणतात की, आय.सी.एस. परीक्षा भारतात घेण्यासाठी यांच्याकडे पैसा भरपूर मिळतो. पण प्राथमिक शिक्षणावर खर्च करायला यांच्याकडे पैसा नाही का…? प्राथमिक शिक्षणावर खर्च झाल्यास हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित असलेला बहुजन समाज शिक्षण घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती करणार.
शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राजर्षी शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ कोल्हापुरात रोवली. शाळांसाठी इमारती व पैसे नसतानाही राजर्षी शाहूंनी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणांसाठी कष्ट घेतले. आज जिल्हा परिषद, महानगरपालिकेसाठी इमारती, शिक्षक व निधी असतानाही शिक्षणाची हेळसांड होत आहे. शाहू महाराजांचे उठता बसता नाव घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांच्या कार्यातून बोध घेऊन मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलंच पाहिजे.
जातिव्यवस्थेची कठोर बंधने असतांना शाहू महाराजांनी जानेवारी १९१९ मध्ये सर्व शाळांमधून अस्पृश्य आणि स्पृश्य विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली पाहिजे असा एक हुकूम काढला….या हुकूमात शाहू महाराज म्हणतात की, *”शिक्षण संस्था या गरीब लोकांसाठी असून गरिबातील गरीब जे अस्पृश्य त्यांना समतेच्या पायावर उभे करावे..अस्पृश्य लोकांना ममतेने,आदराने वागवावे कारण स्पृश्य लोक कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढू शकतात पण अस्पृश्य लोकांना ते जमणार नाही.”* अस्पृश्य विद्यार्थ्यांना तुच्छतेने वागविल्यास तसेच जातीभेद केल्यास शिक्षकांना त्याचे उत्तर विचारले जाईल असे शाहू महाराजांनी बजावले होते.
इ.स. १९०२ मध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीय समाजातील लोकांसाठी नोकऱ्यामध्ये विशेष राखीव जागा दिल्यामुळे आपल्या पोटावर पाय आणणार हि भीती तत्कालीन मक्तेदार ब्राह्मणांना वाटत होती. कारण लोकसंख्येत फक्त तीन टक्के असलेल्या ब्राह्मणाच्या हाती सर्व महत्वाची स्थाने होती. त्यामुळे सर्व समाजातील मुले शिकली तर आपल्या मुलांची मक्तेदारी नष्ट होणार या भीतीमुळे उच्चवर्णीय ब्राह्मण समाज शाहू महाराजांचा विरोध करीत होते.
१९१६ पासून कोल्हापूर संस्थानात सार्वत्रिक मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे वारे वाहू लागले होते. १९१८-१९ मध्ये खेडोपाड्यात त्याचा अंमलही करण्यात आला. ज्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा भारतात १९५० मध्ये लागू झाला तोच कायदा शाहू महाराजांनी कित्येक वर्षे अगोदरच शिक्षणाची गरज ओळखून तयार केला होता. शाहू महाराजांच्या दूरदृष्टी मानाचा मुजरा…

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

शाहू महाराजांचे महिला विषयक धोरण..”

भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेवर आणि जातीव्यवस्थेवर अवलंबून आहे. तसेच पुरुषप्रधान संस्कृतीचा सच्चा समर्थक सुद्धा. हि व्यवस्था खऱ्या अर्थाने विषमतावादी आहे कारण या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात येते. हि विषमता देवांशी, धर्माशी, स्वर्गाशी, नरकाशी, जोडली गेली होती. अश्या विषमतावादी व्यवस्थेची झळ ज्यांना बसते ते बंड केल्याशिवाय राहणार नाही हेहि तितकेच खरे. अनेकांनी या समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला पण जो एका संस्थांनाचा राजा आहे अश्या शाहू महाराजांने विषमतावादी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची पहिलीच वेळ.
किड्या-मुंग्याचे आयुष्य वाट्याला आलेल्या मोठ्या बहुजन समाजाला स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय हि मूल्ये मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी लढा पुकारला…एका राजाने बंड केले अन् समाजाची नाळ रचना,परिवर्तन,बदल,सुसंस्कृतपणा,माणुसकी आणि न्यायाशी जोडली. समाजाच्या जडणघडणीत,विकासात महिलांचा सहभाग असावाच लागतो पण वर्णवादी व्यवस्थेने या महत्वपूर्ण घटकांचा वाटा पद्धतशीरपणे संपविण्याचे कटकारस्थान केले होते. हिंदू समाजात स्त्रियांना पिळवणुकीचे साधन मानल्या गेले आहे..कधी हुंड्यासाठी स्त्रियांना जाळण्यात आले तर कधी पती मरण पावला तर पतिच्या चित्तेसोबत स्त्रियांना जाळून टाकले जात होते. तर कधी तिचे मुंडन करून तिला अंधारात फेकून दिल्या गेले.
महिलांच्या वाट्याला हिंदू धर्मात जेवढ्या यातना आल्या तेवढ्या यातना अन्य दुसऱ्या कोणत्याही धर्मात आल्या नसाव्यात..ती एकाच वेळी देवी होती आणि दासी,पापयोनी होती. ती एकाच वेळी युगायुगाची माता होती आणि बलात्काराचे साधनही. संस्कृतीच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या आणि मनुस्मृतीच्या नखाने जखमी झालेल्या या महिलांना वाचविण्यासाठी, तिला तिचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धापासून प्रयत्न सुरु होते. महात्मा फुले यांनी तर भारतीय वर्णवादी व्यवस्थेच्या पोटात सुरुंग उडावा अशी गोष्ट १८४८ साली केली. ती म्हणजे पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून वर्षानुवर्षे गुलामी ज्यांच्या वाट्याला होती त्यांच्या हातात शिक्षणाची दोरी सोपवली. आणि हा एक धाडसी निर्णय घेऊन समाजव्यवस्थेत क्रांती घडवून आणली…….
इतिहासाची पाने चाळत असतांना सतीबद्दल क्रांतिकारी फर्मान मुहंमद तुघलकांनी आपल्या साम्राज्यात काढले. त्यात त्यांनी म्हटले की सती जाण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक आहे. पण हा निर्णय प्रतिगाम्यांना आवडला नसावा म्हणून प्रतिगाम्यांनी आणि इंग्रजी इतिहासकारांनी त्यांना वेडे ठरविले. अकबर बादशहाने आपल्या साम्राज्यात सती जाण्यास प्रतिबंध करण्यासोबतच बालविवाहाला सुद्धा बंदी घातली. लग्नाच्या वेळी मुलामुलींमध्ये १२ वर्षापेक्षा जास्त अंतर असू नये तसेच लग्नासाठी मुलीचे वय १४ आणि मुलाचे वय १६ वर्ष पूर्ण झाले असावे असा कायदा केला……
१८२९ मध्ये लार्ड विल्यम बेंटिंग ने सती प्रथेला बंदी घालणारा क्रांतिकारक निर्णय घेतला…या सर्वांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी महात्मा फुले,आगरकर आणि कर्वेनी प्रयत्न केले. हाच वारसा जपत शाहू महाराजांच्या काळात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम कार्य झाले. ज्या काळात मुलीच्या लग्नाचे वय १० आणि मुलाच्या लग्नाचे वय १४ होते त्या काळात १२ जुलै १९१९ मध्ये विवाहासंबंधीचा कायदा गॅझेटियरमध्ये प्रसिद्ध करून शाहू महाराजांनी मुलीच्या लग्नाचे वय १४ आणि मुलाच्या लग्नाचे वय १८ वर नेले. हा कायदा केल्यामुळे वयात आल्यानंतर मुलींना आपल्याला आवडेल तो जोडीदार निवडून विवाह करता येत होता. त्यामुळे या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांच्या त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले.
बालविवाह हे महिलांच्या स्वातंत्र्याला मारक आहे. कारण बालवयात लग्नाच्या बंधनात अडकल्यास ती स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही…काही कळण्याच्या आतच जर विवाह झाला तर ती मुलगी चूल आणि मूल मध्ये गुंतून जाते. अश्यावेळी जाती संपवायला आणि वर्णवादी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तिच्याकडे वेळ कुठला असणार…? हि सर्व बिकट परिस्थिती लक्षात घेता शाहू महाराजांनी जोडीदार निवडण्याचे दिलेले स्वातंत्र्य क्रांतिकारक ठरले. शाहू महाराजांनी केलेला कायदा तेव्हाचा काळ नजरेसमोर आणला की त्या कायद्याचे महत्व आपल्याला कळायला लागेल. एकीकडे टिळकांसारखे पुढारी संस्कृती टिकविण्याचा नावाखाली सामाजिक बदलाला विरोध करीत होते तर दुसरीकडे शाहू महाराज स्त्री उद्धाराच्या,स्त्री मुक्तीच्या भावनेने सर्व संकटाना सामना करीत आपला पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत होते.
भारतीय संस्कृती हि पुरुषप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. यामुळे हजारो वर्षापासून महिलांना दुय्यम स्थान दिले गेले होते. चूल आणि मुलं यामध्येच महिलांचे विश्व सामावले गेले. स्त्री भ्रूणहत्या,विधवा विवाह बंदी, सतीप्रथा, बालविवाह अशी कित्येक तरी वाईट प्रथा महिलांवर अमानुषपणे लादल्या गेल्या होत्या. शाहू महाराजांनी महिला वर्गाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आधी बालविवाहास कायद्याने बंदी घातली त्यानंतर आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्यासाठी सुद्धा कायदा केला. त्याकाळी पतीच्या निधनानंतर पत्नीला भयंकर त्रास सहन करावा लागायचा. पती मरण पावला तर पत्नीला दोषी ठरविल्या जात असे. तसेच विधवा झालेल्या पत्नीला दुसरा विवाह करण्यास बंदी होती. तसेच महिलांना समाजाकडून अपमान सहन करावा लागत असे.
विधवा विवाह बंदी घातल्यामुळे होणारे होणारे सामाजिक दुष्परिणाम शाहू महाराजांनी सांगितले. तसेच विधवा विवाह कसा आवश्यक आहे हे सुद्धा आपल्या संस्थानात सांगायचे..पुनर्विवाह झाला तर महिलांचे आयुष्य आनंदात जाईलच आणि समाजाकडून होणारे अन्याय,अत्याचार यापुढे होणार नाही असे शाहू महाराजांना वाटत होते. महिलांसाठी केलेले सर्वच कायदे त्यांच्यापर्यत पोहचतात असे नाही कारण हुंडा घेणे कायद्याने जरी बंद केले गेले असले तरी आजही कित्येक महिलांना हुंड्याच्या नावाखाली मारल्या जाते. बालविवाह कायद्याचे जरी बंद करण्यात आला असला तरीही आजही सर्रासपणे बालविवाह करण्यात येतच आहे. त्यामुळे कायदे नुसते कागदावरच राहून जातात…
कायदे करणारी यंत्रणाच कायद्याची योग्य अंमलबजावणी करत नसेल तर महिलांच्या उन्नतीसाठी कितीही कायदे केले तरी त्याचा काही उपयोग होणार नव्हताच. बऱ्याच कुटुंबात महिलांचा छळ होतो,पण घरची प्रतिष्ठा रस्त्यावर येईल या भीतीने तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध समाजापुढे येऊन सांगत नाही. तसेच कुटुंबाचा होणार त्रास सहन होत नसल्यास काहीजण आत्महत्या करतात याची शाहू महाराजांना कल्पना आली होती. समाजाकडून,घरच्यांकडून होणारा छळ इतका भयानक असतो की बिचाऱ्या महिलांचा स्वतःचे आयुष्यच नकोसे वाटत जाते, याला जबाबदार कुणी असेल तर इथली वाईट समाजव्यवस्था. शाहू महाराजांनी अतिशय बारीकपणे कुटुंबव्यवस्थेचा आणि तेथील ताण-तणावाचा अभ्यास केला होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी एक कायदा करून या कायद्याद्वारे स्त्रियांना क्रूरपणे वागविणाऱ्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि २००/- रुपये दंड म्हणून घेतले जाईल असे नमूद केले.
पुनर्विवाहचा कायदा जरी केला असला तरी सुद्धा घटस्फोटाची पद्धत सुरु होती. पती-पत्नीला एकत्र मिळून संसार करायचा नसेल तर ते घटस्फोट घेत..घटस्फोटाची हि प्रक्रिया जातपंचायत पूर्ण करत असे. बऱ्याच वेळी जातपंचायतला घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करतांना दीर्घकाळ लागायचा. स्त्रियांवर अन्याय होण्याची शक्यता सुद्धा असे. हे सर्व टाळण्यासाठी शाहू महाराजांनी ११ जुलै १९१९ मध्ये घटस्फोटाचा कायदा केला आणि २ ऑगस्ट १९१९ मध्ये कायदा अंमलात आणला.
आपल्या नवऱ्याला महारोगाने ग्रासले, तो नापुसंक आहे अश्या वेळेला पत्नीला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे असे शाहू महाराजांनी कायद्यात नमूद केले. हे सर्व कायदे करून शाहू महाराजांनी महिलांना अधिकार मिळवून दिले. पुरुषप्रधान संस्कृतीत पती कसाही असला तरी चालतो,महिलेचे एकदा लग्न झाले तर ते कायमचे..मग नवरा म्हातारा असो की रोगी संसार करावाच लागत असे. केवळ परंपरा सांगते म्हणून एखाद्या स्त्रीला अमानुष वागणूक मिळू नये यासाठी शाहू महाराजांनी खोलवर विचार केला.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

कलागुणांना वाव देणारा कलाप्रेमी..”

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडनघडणीत योगदान देण्यात कोल्हापूर,बडोदे आणि ग्वाहेर हि संस्थाने अग्रेसर होती. ह्या संस्थानात अनुक्रमे छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि श्रीमंत माधवराव शिंदे हे होते. साहित्य,संगीत, कला ह्यासारख्या विविध क्षेत्रात वरील मंडळींच्या प्रोत्साहनामुळेच भरीव भर झाली..ह्यात शाहू महाराजांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल कारण सार्वजनिक जीवनात होतकरू आणि हुशार कलाकारांना महाराजांनी वेळोवेळी मदत केली….रंगभूमी गाजविणारे अण्णासाहेब किर्लोस्कर,भाऊराव कोल्हटकर,गणपतराव जोशी,बाबुराव पेंटर ह्या सारखे अनेक कलाकार कोल्हापुरातून घडले..आणि भारतात नावारूपास आले.
शाहू महाराजांनी १८९५ मध्ये उत्तर भारतातील अल्लादियाखाँ या संगीतसम्राटाला आपला दरबारी गायक म्हणून नियुक्त केले..या गुणी कलाकारांची कदर आधी महाराजांनी घेतली….आणि त्याचमुळे *”माझे शाहू महाराज मला मिठभर देत आहेत तेवढी मला पुष्कळ आहे”* हे उद्गार अल्लादियाखाँ नेहमी प्रत्येकाजवळ अभिमानाने काढत असत….एक दरबारी गायक म्हणून वागणूक न देता आपल्या मित्राप्रमाणे महाराजांनी वागणूक दिली.१९०१ मध्ये करीमखा कोल्हापुरात आले असता त्याचे संगीत महाराजांनी आपल्या दरबारासमोर सादर करायला लावले…त्यावेळी महाराजांनी त्यांचा रीतसर सन्मान केला. करीमखा हे सहा महिने कोल्हापुरात मुक्कामास होते. त्याच सुमारास गाणे शिकण्यासाठी मामा सोबत केसरबाई केरकर आल्या होत्या. करीमखा ने केसरबाई ला संगीत शिकवले.
म्हैसुरमध्ये गुलाबबाई ह्या गायनकलेत लोकप्रिय होत्या. त्यांच्यासोबत हैदरबक्ष सारंगिये होते. एकदा ते कोल्हापुरात आल्यावर त्याच्या गायनकलेतील गुण हेरून महाराजांनी त्यांना नोकरीस ठेवले. अल्लादियाखाँ आणि हैदरबक्ष हे कोल्हापूर संस्थानाचे अनमोल रत्ने होती…ह्या दोघांच्या कलेला महाराजांनी महाराष्ट्रभर दाद मिळवून दिली. त्या काळात सुप्रसिद्ध गवई देवासकर ह्यांना अल्लादियाखाँ कडून गायन शिकायचे होते. रजबअल्ली हे देवासकरांचे गुरु होते. पण अल्लादियाखाँ आणि रजबअल्ली ह्या दोघांचे पटत नव्हते. ह्यामध्ये महाराज फक्त न्यायाधीशांच्या भूमिकेत असत कारण जरी अल्लादियाखाँ दरबारी गायक असला तरी एक कलाप्रेमी असलेला राजा ह्या दोन्ही उस्तादाची तुलना केली नाही..दोघांनाही न्याय मिळावा म्हणून त्यांनी रजबअल्ली ह्यांना वेगवेगळ्या संस्थानात पाठवीत असायचे…
शाहू महाराजांना प्रसिद्ध गायकाचे संगीत ऐकण्याचा नाद होता. १९१७ मध्ये एकदा ते परिवारातील बाळासाहेब गायकवाड यांच्यासोबत अचानक एका गायिकेच्या घरी गेले असता महाराजांना बघून त्या गायिकेने महाराजांचे पाय पकडले..त्यावेळी महाराज म्हणतात,माझे पाय कशाला धरलेस…? उत्तर देतांना ती गायिका म्हणते की, महाराज आपले दरबारी गायक अल्लादियाखा यांच्याकडून मला गायन शिकायचे आहे..त्यावर महाराज म्हणतात आधी तू कशी गातेस हे मी नको बघायला का..? आधी म्हणून दाखव..गायिकेने एक सुंदर गायनातील राग म्हणून महाराजांना दाखविला..तिच्या सुमधुर आवाजाने महाराज मंत्रमुग्ध झाले…आणि ती गायिका होती महाराजांनी १९०१ मध्ये बघितलेली नऊ वर्षाची चिमुरडी केसरबाई केरकर…
महाराजांची दूरदृष्टी बघा किती महान होती हे खालील व्यक्तीच्या यशातून आपल्याला दिसून येईल..एकदा केसरबाई केरकर ह्या मुंबईला जाताना कोल्हापूरात महाराजांना भेटावयास आल्या. त्यावेळी केसरबाई चे गाणे ऐकण्याची इच्छा महाराजांनी व्यक्त केली. महाराजांच्या इच्छेचा मान राखत त्यांनी अल्लादियाखा ह्यांनी शिकविलेल्या चिजा गाऊन दाखविल्या..ह्यावर महाराज खुश होऊन म्हणतात की, एक दिवस असा येईल की संपूर्ण देशात तुझ्या गायनाची तारीफ होईल.. राजा असावा तर शाहू महाराजांसारखा, प्रत्येक घटकांवर तितक्याच तळमळतेने प्रेम करणारा. एक सच्चा कलाप्रेमी, कालाप्रेमींचा आश्रयदाता. कलाकारांना मोठ्या उंचीवर नेणारा दिलदार राजा…

अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराज हे सामान्य माणसात मिळणारे, सामान्यांसाठी झटणारे राजा होते. सामाजिक लोकशाही निर्मितीसाठी शाहू महाराजांनी अतोनात कष्ट उपसले. सर्वांना न्याय मिळावा, माणुसकीचे हक्क मिळावेत, अस्पृश्‍यांना समानतेची व माणुसकीची वागणूक मिळावी, वैज्ञानिकता त्यांच्या अंगी यावी म्हणून त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. यावरून शाहू महाराजांचे मोठेपण हे लक्षात यायला लागते. आज मात्र आम्ही व आमच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श बाजूला ठेवला आहे. त्यांचे नाव घेऊन आम्हीही त्यांचेच आहोत म्हणणारेही त्यांच्या विचाराने वागत नाहीत उलट आपल्या सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. मानवी मूल्य पायदळी तुडवताना दिसतात. ज्या शाहू महाराजांनी लोकशाही निर्मितीसाठी कष्ट उपसले, त्याच लोकशाही धिंडवडे काढताना आजचे राज्यकर्ते आम्हाला दिसत आहेत.
आम्ही समाजाचे काही देणे आहोत, समाजाच्या प्रगतीसाठी आपलेही काही योगदान असावे, असे मात्र आताच्या कुठल्याच राज्यकर्त्यांना वाटत नाही एवढे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वार्थासाठी, मतलबासाठी, जातीसाठी, धर्मासाठी राजकारण करणे चालू आहे परंतु मानवतेसाठी, मानवी कल्याणासाठी राजकारण करावे लागते हे मात्र त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडूनच शिकायला हवे, त्या पद्धतीनेच आपली सत्ता पुढे घेऊन जायला हवी व सामान्याचे हित जोपासायला हवे. त्यांच्या विचारांची, आचारांची व कृतीची आज देशाला गरज आहे. प्रत्येक मानवाने त्यांच्या विचाराने कार्य केले तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही.

संदर्भ: राजर्षी शाहू गौरव ग्रंथ

सुरज पि. दहागावकर.
चंद्रपूर
मो.न.8698615848
9960020762

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!