एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

0
122

चंद्रपूर : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर आगारातून सुरू झालेल्या कामगारांच्या संपाला दोन महिने होत आहेत. राज्यात एसटी कामगारांवर होणाऱ्या प्रत्येक कारवाईची सुरुवात चंद्रपूर विभागीय आगारातून होत आहे. राज्यात सर्वप्रथम निलंबनाचे आदेश असो की बडतर्फीचे अथवा बदलीची सर्वच कारवाई चंद्रपूर विभागीय आगाराने केली, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या जिद्दीने पेटलेल्या कामगारांनी आता थेट स्वेच्छा परवानगी मागितली आहे.

चंद्रपूर विभागीय आगारातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शाहेस्ता साहिल, ललिता अहिरकर, अमोल पडगेलवार, गजानन भवणे, दिनदास चामाटे, अजाबराव मेश्राम, संजय पटले, सौरभ हिंगमिरे, निखारे, अमृत किंनाके, अरविंद धोटे, प्रकाश फटिंग, राजू दांडेकर उपस्थित होते.

कौटुंबिक संबंधात वाढला तणाव

कोविड काळातही जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावले. मात्र, न्याय मिळाला नाही. आता कामगारांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले. कौटुंबिक संबंधात तणाव निर्माण होत आहे. कमी पगारात अधिक कार्य करणे, लहान चुकीसाठी मोठा आर्थिक भुर्दंड भरणे, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षेला सामोरे जाणे हे प्रकार थांबले नाहीत, असा संघटनेचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here