शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान शेडवाही (भारी) येथील घटना

315

जिवती: शॉर्ट सर्किटमुळे शेडवाही (भारी) येथील एका घराला सोमवारी रात्री १२:३९ वाजता आग लागून लाखो रुपयांचे संसारिक साहित्य जाळून खाक झाले यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली.सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शेडवाही (भारी) येथील दत्तू सोमा वाढई यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीने भीषण रूप धारण करून घरातील संसार उपयोगी साहित्यासह शेतीकरिता आणलेले १५ रासायनिक खतांच्या बॅग,डीजे सिस्टम चे बॉक्स, टीव्ही, फ्रीज, व इतर मौल्यवान वस्तू जाळून खाक झाल्या. आग विझविण्याचा शेजाऱ्यांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. दत्तू सोमा वाढई या शेतकऱ्यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

जुलै महिन्यातील संततधार पावसाने आधीच शेतकऱ्यांचे एका एकर शेतात दोडके , चवळी या भाजीचे पीक पुर्णतः वाहून गेले होते त्यात त्यांना मोठे नुकसान झाले होते शासनाने त्यांना कुठलीच मदत केली नाही त्यात अजून आगीचे संकट आल्याने वाढई कुटुंब आगीने होरपळून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. सदर घटनेचा तात्काळ मोका पंचनामा करून वाढई कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.