प्राध्यापक व डाॅक्टर यांच्यामुळे भारतीयांचे मोठे नुकसान .? देशातील राजकारणी सत्ता मूठभर लोकांनी बळकावली? अंधश्रद्धेच्या बेडया् अजूनही तोडल्या नाहीत. डॉ. अनुरध्वज यांनी व्यक्त केले रोखठोक विचार.

595

चक्रधर मेश्राम दि. 10 सप्टेंबर 2021:-

जगतांना अनुभवतो की, आपल्या देशातून अज्ञान, अंधश्रद्धा व अडाणीपणा २१व्या शतकातही ( ज्याला वैज्ञानिक क्रांतीचे शतक म्हणतात ) हद्दपार झालेले नाही. सध्याचे साक्षरतेचे प्रमाण ७४% आहे. पण सगळीकडे सारासार विचार करण्याची प्रवृत्ती व बुध्दिवादाचा अभाव दिसून येतो. अनादी काळापासून एक मोठा वर्ग हा गुलामिच्या मानसिकतेत जीवन जगत आलेला आहे. खूप मोठा काळ ज्ञानाचे दरवाजे बंद असल्यामुळे जागतिक दर्जाचे ज्ञान सज्ञान झाल्यावर सुध्दा समजणे तर दुरच राहिले पण खुळचट कल्पनाही सोडता आल्या नाहीत. आजतागायत देशाचे राजकीय सत्ताकेंद्र हे मूठभर परंपरावाद्यांच्या हाती राहीले, त्यामुळे धर्म,जात, रूढी परंपरा व अंधश्रद्धेच्या बेड्याही तोडता आलेल्या नाहीत. समाजमन असुधारित असण्याचे प्रमुख कारण म्हणजे कार्यकारणभाव समजण्याचा असलेला सार्वजनिक अभाव,हे होय!
सम्यक ज्ञानाचा सार्वत्रिक अभाव कां निर्माण झाला?…… याचे व्यक्तिपरत्वे अनेक कारणे असतिलही परंतू सत्य ज्ञान व सत्य दृष्टी देणारे हे कपटी व स्वार्थी निर्माण झाले. मागिल ७० वर्षाचा कालखंड हा भारतियांकरिता स्वातंत्र्ययुग होता. कारण पारतंत्र्य गेले तरीही भारतीय नागरिकांचे जीवन जातीवाद, अंधश्रद्धा,कर्मकांड व देशाभिमानी भावनेच्या अभावाने लोखंडाप्रमाणे गंजत गेले. याला कारणीभूत असणारे विषेशत्वाने दोन घटक आहेत. एक म्हणजे प्राध्यापक व दुसरे डॉक्टर” ..इतर व्यावसायिकांच्या तुलनेत समाजाभिमुख असणारे प्राध्यापक व डाॅक्टर हे दोन घटक त्यांच्या कर्तव्यातिल नितीमत्तेचा विचार करता मला महत्त्वपूर्ण वाटतात.
एखादा सिध्दांत,नियम व नियमावली जे नैसर्गिक तत्त्वाला धरून आहेत, त्याला या पेशाधारकांनी तिलांजली दिली आहे. या दोन्ही पेशाधारकांच्या वैचारिक पातळीमध्ये बदल झाला नाही तर देशातिल जनतेला अनंत काळ मागासलेच राहावे लागेल. सम्यक ज्ञानी व परिवर्तनवादी विचारांचे प्राध्यापक व डाॅक्टर सोडले तर देशाच्या मागासलेपणाला दोन्ही पेशाधारक इतरांपेक्षा जास्त दोषी आढळतील.
एकेक पेशाधारकाचा परामर्श घेणे महत्त्वाचे आहे.
प्राध्यापकांचा परामर्श घेण्यापूर्वी एक बाब लक्षात घ्या की, शिक्षक गृहित धरलेले नाहीत. आई-वडील हे विद्यार्थ्यांचे प्रथम गुरू आहेत. ते अल्पशिक्षित आहेत. उच्च शिक्षित असलेले पालक प्राध्यापक व डाॅक्टर यांच्या कपट व स्वार्थिपणाला बळी पडलेले आहेत. शिक्षकांची शैक्षणिक पात्रता कमी असली तरीही ओल्या मातीसारख्या असलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक आकार देतात. मात्र “सामाजिक विचार” पेरण्याची त्यांची कुवत व विद्यार्थ्यांचा मेंदू कमी पडतो.
प्राध्यापक हे उच्च शिक्षित असतात. काही प्राध्यापक तर पी.एचडी. असतात. प्रत्येक विषयाचे वाचन,मनन, विश्लेषण व पठन ते करित असतात. मुळातच ते अठरा वर्षांवरील मुला-मुलींना शिकवतात. ते अभ्यासपूर्ण माहितीचे आदानप्रदान करीत असतात. विद्यार्थ्यांचे दुर्दैव असे की, कितीही विद्वान असले तरी ( वैज्ञानिक असेल तरीही ) ते अंधश्रद्धा पाळतात, देवाला पूजतात व कार्यप्रसंगी ब्राम्हणाच्या हातून पूजा करून घेतात. स्वर्ग-नरक कल्पनेवर विश्वास ठेवतात. जातीयता पाळतात. परंपरेतून आलेल्या सण,उत्सव व चालीरीतींना प्रोत्साहन देतात. याचे दुस्परिणाम स्पष्ट दिसत आहेत, ते असे…..‌‌
१. नाविन्याचा ध्यास
विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही.
२. राष्ट्रीय मुद्दे—– देशाभिमान, राष्ट्रभक्ती, विकास, भ्रष्टाचार, आरक्षण, शैक्षणिक धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांना खऱ्या स्वरुपात समजत नाहीत.
३. नंबर दोनची लोकसंख्या असूनही वैज्ञानिक शोध नगण्य आहेत. ( बरेचशे वैज्ञानिक अंधश्रद्धाळू निपजतात )
४. सामाजिक समतेचा अभाव आहे.
५. एकही विद्यापीठ जागतिक दर्जाचे नाही.
६. भारतात स्त्री-पूरुष भेद जास्त प्रमाणात आढळतो.
७. ऐतिहासिक तथ्य जनतेसमोर येत नाही वगैरे…..
वास्तविक पाहता प्राध्यापकांनी योग्य क्षमतेने विश्लेषण करून वैज्ञानिक सत्य विद्यार्थ्यांसमोर मांडले व आचरणातून मार्गदर्शक म्हणून मानवतावादाचे जीवन जगले तर आपला देश प्रगतीपथावर राहू शकतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहिस्कृत भारतातील अग्रलेखात म्हणतात, महाविद्यालये व विद्यापीठे हे कारकून काढण्याचे कारखाने होऊ नयेत. राष्ट्राचे आदर्श नागरिक त्यांनी तयार करावे.
प्राध्यापकाविषयी मत व्यक्त करतांना म्हणतात, प्राध्यापक व्यासंगी, विचारवंत आणि नवदिशाप्रवर्तक असावा. गाईड्स लिहिणाऱ्या आणि वेतननिष्ठ प्राध्यापकाविषयी ते म्हणतात, थोडेसे रूपये मिळवावेत व आपली सुखाने कालक्रमणा करावी यापलीकडे आपल्या प्रोफेसरांना आयुष्यात काही महत्त्वाकांक्षाच नाही. या महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळे त्यांच्या हातून काही भरीव कार्य होवू शकत नसावे.
विज्ञानवादी व बौद्धिक उच्चक्षमता लाभलेले बुध्दिष्ट ( ज्यांच्या बुध्दिला इष्ट × अनिष्ट चा भेद कळतो ते ) प्राध्यापक सोडले तर बाकी प्राध्यापक देशाच्या ज्वलंत प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन करण्यास अक्षम आहेत. बरेचसे प्राध्यापक तर काॅलेजमध्ये व विद्यापिठात देवाचा प्रसाद वाटतात. ऐकलेल्या किंवा काल्पनिक गोष्टींचा प्रसार करतात. जातीवादाविरूध्द चकार शब्द ही काढत नाही. याला अपवाद असणाऱ्या प्राध्यापकांना मानाचा सलाम !
सरकारी काॅलेज व विद्यापीठे हे जनतेच्या पैशातून उभे राहतात. युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे पण त्यांनाच घडविणारे मेंदू सम्यक ज्ञानाने परिपूर्ण नसतिल तर……???
विचार करा.
डाॅक्टरांचे पोस्टमार्टेम कसे होते ते पाहू.
वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत धर्म, परंपरा समाजातिल वडीलधाऱ्या मंडळी व यथातथा शिक्षकांच्या शिकवण्यातून मिळालेल्या अर्धवट ज्ञानाने युक्त अशा तरुण-तरुणिंचा घोळका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करतो आणि त्यांचा मानवी शरीराचा इत्थंभूत ( सूक्ष्म ते अतिसूक्ष्म ) अभ्यास सुरू होतो. Anotomy and Physiology पासून सुरुवात करून मेंदुला झिणझिण्या आणणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा मारा करून झाल्यावर साडेचार वर्षांनंतर “डॉक्टर”तयार होतो.
वैद्यकीय शिक्षण देतांना प्राध्यापक त्या विद्यार्थ्यांना मानवी शरीर व मेंदुमधील सत्य माहिती सांगत नसावेत. ” आत्मा” शरीरात नसतोच. कोणत्याही देवाचा किंवा दैवी शक्तीचा सजिवांच्या जन्माशी संबंध नाही. माणूस आजारी होण्यास शारीरिक, मानसिक व नैसर्गिक कारणे असतात. स्वर्ग-नरक-देव ह्या भ्रामक कल्पना आहेत. कोणताही देव कोणताच आजार, व्याधी किंवा त्रास कमी करू शकत नाही. वेगवेगळे बॅक्टेरिया, व्हायरस, जंतू यामुळे होणाऱ्या आजारांना तसेच अपघात, घातपात, नैसर्गिक संकट यामुळे होणाऱ्या व्याधी योग्य उपचारांनी बऱ्या होतात. देवाचा हवाला द्यायची आवश्यकता नाही.
असे असूनही एम.एस., एम.डी.,एफ.आर.सी.एस. आणि तत्सम डिग्री मिळविणारे तज्ञ डॉक्टर व डाॅक्टरांची टीम निर्लज्जपणे त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये देवाचा फोटो किंवा मूर्ती दर्शनी भागात ठेवतात. दवाखान्यात प्रवेश करतांना असहाय्य रुग्ण व नातेवाईकांसमोर देवाला हार घालतात, पूजा करतात, पाया पडतात. रुग्णालयातील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना स्वत:च्या उपचारांनी बरा करण्याची हमी न देता प्रयत्न करणारा मी असलो तरी सर्वशक्तिमान परमेश्वर वाचवू शकतो , असे सांगतात. चुकीच्या कल्पना रुग्ण व नातेवाईकांच्या मेंदूत ओततात.
फक्त पैसा मिळविण्यासाठी आपल्याच देशातील भाबड्या जनतेला खोटे सांगणाऱ्या डॉक्टरांना देशद्रोही कां म्हणू नये ?
विषेश नोंद घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत……..
१. चोरून गर्भजल परिक्षण करणारे डॉक्टरच असतात…देव यांना काहीच करित नाही.
२. गुपचूप पणे बेकायदेशीर गर्भपात करुन येणाऱ्या जीवाचा जीव घेतात …देव यांना काहीच करित नाही.
३. चुकीच्या औषधोपचाराने रुग्ण दगावतो पण पैसा वसूल करण्यात येतो……देव यांना काहीच करित नाही.
४. अनावश्यक तपासण्या करायला लावून कट प्रॅक्टिसने असहाय्य रूग्णांची लूट करतात………देव यांना काहीच करित नाही.
५. अतिगंभीर रूग्ण आणता क्षणी मृत झाला तरीही त्याला वाचविण्याच्या नाट्यप्रयोगात वापरण्यात न आलेले महागडे साहित्य व औषधी लिहून देतात व नंतर त्यांच्याच मेडिकल स्टोअर्स ला परत करतात………..देव यांना काहीच करित नाही.
६. भारतात शिकलेले डॉक्टर जेव्हा विदेशात प्रॅक्टिस करतात तेव्हा मात्र “देवच वाचवेल” असे रूग्ण व नातेवाइकांना सांगत नाही. कारण तेथे जबर भरपाई द्यावी लागते. या सर्व अनैतिक प्रॅक्टिस ला काही डॉक्टर अपवाद आहेत. जे नास्तिक आहेत, ते प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मानाचा सलाम!
याच पेशाधारकांचा विशेषत्वाने परामर्श घेतला आहे कारण दोन्ही noble profession आहेत. मूळातच देव नाकारले तरच माणूसकिच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. देव स्विकारले तर अंधश्रद्धा, नाडणूक , स्वर्ग- नरक, आत्मा-परमात्मा , कर्मकांड, बुवा-बाबा-माता- अम्मा आणि अगणित ओंगळवाणे प्रकार मेंदुभोवती घिरट्या घालत राहणारच. प्राध्यापक व डाॅक्टर यांना जेव्हा समजेल की, इतरांपेक्षा देशाचे ऋण फेडण्याची संधी आहे व नैसर्गिक रितीने परतफेड केली तर मानवाप्रती खरी सेवा ठरेल, तिथूनच बदल घडायला सुरुवात होईल !(डॉ.अनुरध्वज 9423640480)