गोंडपिपरी: तालुक्यातील गट ग्राम पंचायत, सकमुर अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेतून नळाद्वारे घरोघरी पाणी पुरविले जाते. तसेच जवळपास गावलाही याच पाईपलाईनतुन पाणी पुरविले जाते. याचा कंत्राट श्री. मधू वैरागडे यांच्याकडे आहे.
पण कंत्राटदारांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे मागील १५ दिवसापासून नळाला गढूळ पाणी पुरविल्या जात आहे. टाकीची वेळोवेळी स्वच्छता न करणे, फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्ती न करणे, पाणी फिल्टर न करणे, रासायनिक प्रक्रिया न करता नदीतून जसे पाणी आले तसेच नळाला सोडणे या कारणामुळे गावात खराब आणि पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा पुरवठा होत आहे. शिवाय वेळेवर पाईपलाईन किंवा मशिनी दुरुस्ती न करता जुने सामान रिपेअरिंग करताना वापरल्याने दर 15 ते 20 दिवसाच्या फरकाने अख्खी पाणी पुरवठा योजना खंडित पडत असते. पाणी सोडणारे कर्मचारीही ‘ठेकेदाराला विचारा’ म्हणून हात वर करतात. ग्रा. पंचायतीचे पदाधिकारीही या समस्येकडे विशेष लक्ष देत नाही आहे. पावसाळा आला की, ही समस्या दरवर्षी गावसमोर उभी ठाकते. कंत्राटदाराला फोन लावून जाब विचारला तर प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे मिळते.
गढूळ आणि खराब पाणी पिल्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हगवण, उलट्या, कावीळ, पोटाचे विकार अशा रोगांना आमंत्रण मिळत आहे. अशा बेजबाबदार कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून गावात शुद्ध पाणी पुरवठा करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.